**बार्शीत स्पा सेंटरच्या आडून चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जणांना बेड्या**
**बार्शीत स्पा सेंटरच्या आडून चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जणांना बेड्या**
**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):**स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी बुधवारी (१० जून) मध्यरात्रीच्या सुमारास धडक छापा टाकला. लातूर बायपास रोडवरील नागोबाचीवाडी गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या व चालवणाऱ्या १० आरोपींना रंगेहात अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि वाहनांसह एकूण **१२ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल** जप्त केला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील मटका, जुगार, गुटखा आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या गस्तीवर असताना, 'लक्झरी डिलक्स स्पा मसाज सेंटर'मध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
**मसाज सेंटरच्या नावाखाली 'तिरट' जुगार**
माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या पथकाने सदर स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला. त्यावेळी तिथे काही इसम पैशांची पैज लावून 'तिरट' नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. हा जुगार अड्डा आकाश काशिद आणि स्पाचा मॅनेजर बाबू चौधरी हे दोघे चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी स्पा मालक, मॅनेजरसह जुगारींवर महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
**यांनी केली कारवाई:**
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि महेश माने, पोलीस अंमलदार सोमनाथ खांडेकर, सुरेश बिरकले, महंमदगौस महेदी आणि चालक लक्ष्मण चिट्टलवाड यांच्या पथकाने केली. तालुक्यातील अवैध धंदे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या