**महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर गुन्हा न दाखल करण्यासाठी ५० हजार लाच; दोन पोलिस रंगेहाथ जाळ्यात**
**KDM NEWS प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर :** मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलने महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून गुन्हा दाखल न करण्याच्या बहाण्याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी सायंकाळी दोघांना रंगेहाथ अटक केली. लाचेची पहिली उचल म्हणून १० हजार रुपये स्वीकारल्यानंतर दोघांना ठाण्याच्या आवारातच बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणाने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
**आरोपी :**
- संजय नागूसिंग बहुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुकुंदवाडी पोलीस ठाणे)
- गोकुळ अनिलराव खटावकर (वय ४३, पोलीस अंमलदार/कॉन्स्टेबल, मुकुंदवाडी पोलीस ठाणे)
**घटनाक्रम :**
२२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात एका मुलीशी झालेल्या वादाची तक्रार आली होती. दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने वाद मिटला होता. तरीही बहुरे आणि खटावकर यांनी विद्यार्थ्याला धमकी दिली की, “गुन्हा दाखल करून तुझे करिअर उद्ध्वस्त करू.” गुन्हा टाळण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली.
विद्यार्थ्याने सततच्या त्रासाला कंटाळून एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने शुक्रवारी (५ जून) पडताळणी केली. खटावकरने १० हजार रुपयांची पहिली रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. बहुरे याने याला प्रोत्साहन दिल्याचे समोर आले.
**कोडवर्ड आणि सापळा :**
लाच स्वीकारल्यानंतर खटावकर बाहेर येऊन ‘आळस’ देत (दोन्ही हात वर करून शरीर ताणणे) इशारा देणार, असे कोडवर्ड ठरले होते. पैशांचे पाकीट खिशात टाकून खटावकरने हा इशारा दिला तेव्हाच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. पंचांसमक्ष पुरावा जप्त करण्यात आला.
**कारवाई करणारे अधिकारी :**
- माधुरी केदार-कांगणे (पोलीस अधीक्षक, एसीबी)
- शशिकांत सिंगारे (अपर पोलीस अधीक्षक)
- संतोष तिगोटे (पोलीस निरीक्षक, मुख्य तपास अधिकारी)
या कारवाईत इतर पथक सदस्यांचाही समावेश होता. आरोपींच्या घरी छापे टाकण्यात येत आहेत. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
एसीबीने नागरिकांना भ्रष्टाचाराच्या घटनांची तक्रार न डगमगता नोंदवण्याचे आवाहन केले आहे. ही घटना पुन्हा एकदा पोलीस दलातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याकडे लक्ष वेधते.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या