**कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात: दुचाकीस्वाराचा एसटी बसला जोरात धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, चिमुकली बचावली**
**कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात: दुचाकीस्वाराचा एसटी बसला जोरात धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, चिमुकली बचावली**
**KDM NEWS प्रतिनिधी कुर्डुवाडी:** कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावरील चिंचगाव (ता. माढा) शिवारातील माईलस्टोन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ एसटी बस आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेत त्यांची सात वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली असली तरी ती गंभीर जखमी झाली आहे.
मृतांमध्ये सागर रंभा काळे (वय ३६) आणि नेहा सागर काळे (वय २४, दोघेही रा. नेरले, ता. करमाळा) यांचा समावेश आहे. सागर काळे हे रोपळे (क) येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपली पत्नी नेहा आणि मुलगी दुर्वा यांच्यासह ते दुचाकीवरून (क्रमांक MH 45 AW 1289) नेरले येथून कुर्डुवाडीमार्गे म्हैसगावच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, बार्शीहून स्वारगेटच्या दिशेने निघालेल्या एसटी बसने (क्रमांक MH 14 BT 4652) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली.
**नेमकं काय घडलं?**
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान पती-पत्नीमध्ये गाडीवरच काही कारणावरून वाद सुरू होता. रागाच्या भरात दुचाकी चालकाने गाडीचा वेग वाढवून ती थेट एसटी बसवर धडकवल्याची चर्चा परिसरात आहे. धडक इतकी भीषण होती की, सागर आणि नेहा काळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची सात वर्षांची मुलगी दुर्वा ही अपघाताच्या तीव्रतेमुळे रस्त्यावर न पडता बाजूला मातीवर जाऊन पडल्याने तिचे प्राण वाचले, मात्र ती गंभीर जखमी झाली आहे.
**पोलीस कारवाई**
या अपघाताची बातमी समजताच नेरले गावावर शोककळा पसरली आहे. प्रवीण रंभा काळे यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, एसटी बस चालक धीरज गोरबा शिवारे (बार्शी आगार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामीनाथ लोंढे करत आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या