**बार्शी : पुन्हा पोलिसांची गुटखा विरोधी धडक कारवाई; ९ हजार ३७६ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त, एक आरोपी ताब्यात**
**बार्शी : पुन्हा पोलिसांची गुटखा विरोधी धडक कारवाई; ९ हजार ३७६ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त, एक आरोपी ताब्यात**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू उत्पादनांवर पूर्ण बंदी असतानाही अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध बार्शी शहर पोलिसांनी गुरुवारी (११ जून) सकाळी मोठी कारवाई केली. बारंगुळे प्लॉट परिसरातील एका राहत्या घरातून विविध ब्रँड्सचा ९,३७६ रुपयांचा गुटखा, पानमसाला व जर्दा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य पुरवठादार फरार आहे.
पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, बारंगुळे प्लॉट येथे शाहिद शब्बीर शेख (वय ३१, रा. बारंगुळे प्लॉट) यांच्या घरात प्रतिबंधित पदार्थांचा साठा आहे. त्यानुसार सकाळी ११.१५ वाजता पथकाने छापा टाकला. घरातील स्टोअर रूममध्ये राजनिवास सुगंधित पान मसाला, के.आर. गुटखा, झेडएल-०१ जाफराणी जर्दा, गोवा गुटखा आदी विविध प्रकारचे प्रतिबंधित अन्नपदार्थ सापडले.
दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनाम्याने हा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालातील नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून, उर्वरित साठा पोलिस ताब्यात घेतला आहे. छाप्यादरम्यान आरोपी शाहिद शेख याने हा माल ‘बाबू’ नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याचे सांगितले. मात्र, कोणतीही वैध खरेदी बिल किंवा कागदपत्रे त्याच्याकडे आढळली नाहीत. पुरवठादार बाबूचा (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) शोध सुरू आहे.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार **अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६** च्या कलमांसह **भारतीय न्याय संहिता** कलम २२३, २७४, २७५, १२३ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
बार्शीतील वारंवार होणाऱ्या अशा कारवायांमुळे स्थानिक गुटखा माफियांचे जाळे उघडे पडत असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री-खरेदीबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
टिप्पण्या