**बार्शीच्या कव्हे गावात निसर्गाचा कोप; सोसाट्याचा वारा, वीज आणि झाडाच्या विळख्यात अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू**
**बार्शीच्या कव्हे गावात निसर्गाचा कोप; सोसाट्याचा वारा, वीज आणि झाडाच्या विळख्यात अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २३ :** सोमवारी दुपारी कव्हे गावाच्या शिवारात जोरदार वादळ आणि विजांच्या कडकडाटात एका ४७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजेचा तडाखा बसल्याने लिंबाचे झाड कोसळून ते थेट तिच्या अंगावर पडले.
मृत महिला रत्नमाला रामा चौधरी (वय ४७, रा. कव्हे, ता. बार्शी) अशी आहे. त्या सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजता गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शी-मोहोळ मार्गालगत राजाराम रामलिंग तिकटे यांच्या शेताजवळील लिंबाच्या झाडाखाली बसल्या होत्या. त्याचवेळी अचानक आलेल्या वादळात विजेचा तडाखा झाडावर बसला आणि झाड कोसळले.
घटनेची माहिती मिळताच महेंद्र सुब्राव चौधरी यांना त्यांचे मित्र अमित बाबुराव पाटील यांनी फोनवरून कळवले. घटनास्थळी पोहोचल्यावर रत्नमाला यांच्या अंगावर झाड पडलेले दिसले. ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजूला करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्या खासगी वाहनातून बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्या. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक तपासणीत विजेच्या तडाख्यामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत नोंद घेण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
ही घटना पावसाळ्यात विजांच्या तडाख्यांमुळे होणाऱ्या अपघातांची आठवण करून देते. प्रशासनाने नागरिकांना जोरदार वादळ आणि विजा कडकडत असताना झाडाखाली किंवा उघड्या जागी थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन केले आहे.
कव्हे गावात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली असून चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या