**बार्शीमध्ये तोतया पोलिसांच्या हातचलाखीने वृद्धेची ४ तोळे सोन्याची फसवणूक**

**बार्शीमध्ये तोतया पोलिसांच्या हातचलाखीने वृद्धेची ४ तोळे सोन्याची फसवणूक** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** भरदिवसा शहरात तोतया पोलिसांचा सुळसुळाट सुरू असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 'शेजारी सोनाराचा खून झाला आहे, तपास सुरू आहे' अशी भीती दाखवून चार भामट्यांनी ६५ वर्षीय वृद्धेच्या हातातील ४ तोळे सोन्याच्या पाटल्या हातोहात लांबवल्या. या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमन विलास चौधरी (वय ६५, रा. भोगेश्वरी चाळ, बार्शी) ही सोमवार, १ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भोगेश्वरी मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होत्या. शेंडगे हार्डवेअर दुकानाजवळ एका मुलाने त्यांना अडवले आणि "समोर बोळात तीन मुले तुम्हाला बोलावत आहेत," असे सांगून गल्लीत नेले.

तिथे आधीच थांबलेल्या तीन इसमांनी "आम्ही डिपार्टमेंटचे लोक आहोत," असे म्हणत एक ओळखपत्र दाखवले. त्यांनी सुमन चौधरी यांना सांगितले, "येथे शेजारीच सोनाराचा खून झाला आहे. तपास चालू आहे. तुम्ही सोन्याचे दागिने हातात घालून फिरू नका, ते काढून द्या."

भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुमन यांनी हातातील सोन्याच्या पाटल्या काढून दिल्या. भामट्यांनी "आम्ही कागदात व्यवस्थित गुंडाळून देतो," असे म्हणून पाटल्या घेतल्या आणि अत्यंत चतुराईने त्यांच्या जागी काचेच्या तीन बांगड्या कागदात गुंडाळून सुमन यांच्या हातात ठेवल्या.

घरी आल्यानंतर कागद उघडल्यावर सुमन यांना फसवणूक लक्षात आली. त्यांनी तातडीने पती विलास चौधरी व भाचा किरण कदम यांना घटना सांगितली आणि बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरीला गेलेल्या सोन्याच्या पाटल्यांची जुनी शासकीय किंमत २०,००० रुपये नमूद करण्यात आली आहे.

 KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल