**बार्शी पोलिसांची धडक कारवाई; कोल्ड्रिंक्स गोडाऊन चोरी प्रकरणात दोन आरोपी अटकेत, ६१ बॉक्स जप्त**
**बार्शी पोलिसांची धडक कारवाई; कोल्ड्रिंक्स गोडाऊन चोरी प्रकरणात दोन आरोपी अटकेत, ६१ बॉक्स जप्त**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर ग्रामीण), ६ जून २०२६:** बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत कोल्ड्रिंक्सच्या गोडाऊनमधील चोरीचा छडा लावला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेल्या ८२ बॉक्सपैकी ६१ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.
दिनांक ३१ मे २०२६ रोजी मध्यरात्री सुभाष नगर येथील संदीप राजेश जगताप यांच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ८२ स्टिंग कोल्ड्रिंक्सचे बॉक्स चोरून नेले होते. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. ४३६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३३४(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी टीम) तत्काळ तपास सुरू केला. पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांच्या नेतृत्वात सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. ५ जून २०२६ रोजी पोलिसांनी पंकज नगर, बार्शी येथील अनिकेत राजू केंगार आणि किरण मारुती पोठे या दोघांना अटक केली. आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून ६१ स्टिंग कोल्ड्रिंक्सचे बॉक्स हस्तगत केले आहेत. उर्वरित मालाचा शोध घेण्यात येत आहे. या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल बहिरे, बाळकृष्ण मुठाळ, राहुल उदार, पवार, नितनात, भांगे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या