**FDA ने उघडला मोठा ग्लोव्हज घोटाळा; मलेशियातून विनापरवाना आयात, BMC व सरकारी रुग्णालयांना नॉन-स्टेराइल ग्लोव्हजचा पुरवठा**

**FDA ने उघडला मोठा ग्लोव्हज घोटाळा; मलेशियातून विनापरवाना आयात, BMC व सरकारी रुग्णालयांना नॉन-स्टेराइल ग्लोव्हजचा पुरवठा** 
**KDM NEWS प्रतिनिधी मुंबई :** महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) ने मुंबई, भिवंडी आणि पालघर येथे छापेमारी करून विनापरवाना मलेशियातून आयात केलेल्या नॉन-स्टेराइल सर्जिकल ग्लोव्हजचा मोठा गैरप्रकार उघड केला आहे. या प्रकरणात सरकारी रुग्णालयांसह मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना बनावट स्टेराइल ग्लोव्हज पुरवठा झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. एकूण २ कोटी १७ लाख रुपयांचा वैद्यकीय साठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला आहे.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने प्रथम मुंबईतील साकीनाका येथील मे. साची मेडिक या आस्थापनावर छापा टाकला. या कंपनीने मलेशियातून कोणत्याही आयात परवान्याशिवाय लाखो नॉन-स्टेराइल सर्जिकल ग्लोव्हज आणले होते. या ग्लोव्हजचे भिवंडी आणि वाडा (पालघर) येथे पॅकिंग व लेबलिंग करून सरकारी रुग्णालयांना विक्री करण्यात येत होते. साकीनाका गोदामातून ७४.८५ लाख रुपयांचा ग्लोव्हज साठा जप्त करण्यात आला.

तपासात उघडकीस आले की, या कंपनीकडे वैद्यकीय उपकरणे आयात, साठवणूक किंवा विक्रीचा कोणताही वैध परवाना नव्हता. ‘वैद्यकीय उपकरणे नियम २०१७’ च्या अनेक तरतुदींचा भंग झाला. कागदपत्रांनुसार हा पुरवठा मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना झाला होता. भिवंडीतील उत्पादन युनिटवर छापा टाकत ९.८८ लाख रुपयांचा ग्लोव्हज साठा प्रतिबंधित करण्यात आला असून, उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तेथे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स आदी मूलभूत गोष्टींचा अभाव आढळला.

पालघर जिल्ह्यातील वाडा येथील मे. मेडिअर्थ लाईफकेअर प्रा. लि. या कंपनीवरही धडक देण्यात आली. कंपनीने नॉन-स्टेराइल ग्लोव्हज खरेदी करून स्टेरिलायझेशन मशीन नादुरुस्त असतानाही त्यांना स्टेराइल म्हणून लेबल करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना (जसे जे.जे. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज) पुरवठा केल्याचे मालकाने लेखी कबूल केले. येथे १.२६ कोटी रुपयांचा नॉन-स्टेराइल बँडेज, रोल बँडेज आणि कॉटन गौज साठा (सरकारच्या नावाने लेबल असलेला) विक्रीसाठी प्रतिबंधित करण्यात आला. याशिवाय ६.१७ लाख रुपयांचा अॅलोपॅथिक औषध साठाही जप्त करण्यात आला.

या कारवाईत एकूण ८१ लाख रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला तर १ कोटी ३५ लाख रुपयांचा ग्लोव्हज साठा गुणवत्ता चाचणीसाठी प्रतिबंधित करण्यात आला. संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. FDA ने राज्य आरोग्य विभाग आणि BMC ला याची माहिती दिली आहे.

तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. सर्व रुग्णालये, डॉक्टर्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांना केवळ अधिकृत पुरवठादारांकडूनच खरेदी करण्याचे, परवाना क्रमांक, बॅच नंबर, उत्पादन व एक्सपायरी तारीख तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पुरवठा साखळीतील इतर घटकांचीही तपासणी केली जाईल.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल