**बार्शी नगरपरिषद प्रभाग २० : मुजम्मील पठाण यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू**
**बार्शी नगरपरिषद प्रभाग २० : मुजम्मील पठाण यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू**
**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी)** - नुकत्याच पार पडलेल्या बार्शी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक २० मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मुजम्मील जहांगिर पठाण यांनी विजय मिळवला. मात्र, त्यांना तीन अपत्य असल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १६ अंतर्गत ते नगरसेवक पदासाठी अपात्र ठरल्याची मागणी माजी नगरसेवक अॅड. महेश जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शासनाच्या दोन अपत्य धोरणानुसार तीन किंवा अधिक अपत्य असणाऱ्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करता येत नाही. पठाण यांनी अपत्यांची संख्या लपवून निवडणूक आयोग व शासनाची फसवणूक केल्याचा आरोप जगताप यांनी अर्जात केला आहे. यामुळे त्यांचे पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर (नगरपरिषद प्रशासन शाखा) यांच्या वतीने आशिष लोकरे यांनी १ जुलै २०२६ रोजी पठाण यांना सात दिवसांत खुलासा व आवश्यक कागदपत्रांसह म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिशीची प्रत मुख्याधिकारी, बार्शी नगरपरिषद यांनाही पाठवण्यात आली आहे.
प्रभाग २० व बार्शी शहरात या प्रकरणाची चर्चा जोरात आहे. पठाण यांचे पद टिकते का की जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अॅड. जगताप यांनी पठाण यांच्याविरुद्ध दाखल दखलपात्र फौजदारी गुन्ह्याबाबतही कायदेशीर कारवाई करण्याची माहिती दिली आहे.
सद्यस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील घटनाक्रम स्पष्ट होईल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या