**सर्पदंश आता अधिसूचित आजार; प्रत्येक प्रकरण आणि मृत्यूची नोंद बंधनकारक**

**सर्पदंश आता अधिसूचित आजार; प्रत्येक प्रकरण आणि मृत्यूची नोंद बंधनकारक** 

KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १८ ऑगस्ट : राज्यात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्पदंशाला राज्यभरात ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे. या अधिसूचनेनुसार शासकीय-खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्व डॉक्टरांना संशयित, संभाव्य किंवा निश्चित सर्पदंशाच्या प्रत्येक घटनेची तसेच त्यामुळे झालेल्या मृत्यूची नोंद संबंधित आरोग्य प्राधिकरणाकडे करणे कायद्याने बंधनकारक झाले आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांचे अचूक संनियंत्रण, वेळेवर उपचार आणि सर्पविष प्रतिबंधक लस (एएसव्ही) उपलब्धतेचे नियोजन अधिक सक्षम होईल. ग्रामीण व दुर्गम भागात सर्पदंशाचा धोका जास्त असल्याने वेळेत निदान, प्रथमोपचार आणि लस उपलब्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

**नोंदणी व देखरेख व्यवस्था**  
आरोग्य संस्थांना प्रत्येक रुग्णाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे कळवावी लागेल. ही माहिती एचएमआयएस/डीएचआयएस-२ किंवा आयडीएसपी प्रणालीद्वारे डिजिटल पद्धतीने नोंदवली जाईल. एएसव्ही कुप्यांची संख्या, उपचाराचा परिणाम आणि रेफरल तपशीलही समाविष्ट असेल.

राज्यस्तरावर संचालक (रुग्णालये), जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी तर महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. प्रत्येक रुग्णालयाला एएसव्ही साठा, वापर आणि शिल्लक याची रिअल-टाइम नोंद ठेवावी लागेल. उच्च घटना असलेल्या भागांत लसीचा तुटवडा टाळण्यासाठी तात्काळ पुरवठा सुनिश्चित केला जाईल.

**प्रतिबंधात्मक उपाय**  
घटनास्थळ, हंगाम आणि पर्यावरणीय घटकांच्या आधारे डेटा विश्लेषण करून लक्ष्यित जनजागृती मोहिमा राबवल्या जातील. मंत्री आबिटकर यांनी आवाहन केले की, “वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र आहे. प्रत्येक घटना नोंदवून निरपराध नागरिकांचे प्राण वाचवा.”

ही अधिसूचना सर्पदंशावरील उपचार व्यवस्था अधिक प्रभावी आणि पारदर्शक करणारी आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या