**बार्शी : वारंवार पाईपलाइन फुटत असताना नगरपालिकेचे दुर्लक्ष; होनखांबेंनी तक्रारींकडे कानाडोळा, आठ दिवसांतून एकदा पाणी तरीही लाखो लिटर वाया!**

**बार्शी : वारंवार पाईपलाइन फुटत असताना नगरपालिकेचे दुर्लक्ष; होनखांबेंनी तक्रारींकडे कानाडोळा, आठ दिवसांतून एकदा पाणी तरीही लाखो लिटर वाया!** 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी नगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा पाईपलाइन वारंवार फुटत असताना प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी नगरपालिकेत वारंवार जाऊन तोंडी तक्रारी दिल्या तरी दुरुस्तीकडे कोणतीही कारवाई होत नाही. बार्शी नगरपालिकेतील पाणीपुरवठा अधिकारी अजय होनखांबे यांनी अशा तक्रारींकडे सातत्याने कानाडोळा केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असतानाही फुटलेल्या पाईपलाइनमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचा भडका उडाला आहे.

नागरिकांच्या माहितीनुसार, एका महत्त्वाच्या पाईपलाइनला फुट पडल्याने परिसरातील घरांत पाणी घुसत आहे. फुटलेल्या ठिकाणी दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज असल्याने दुरुस्ती पथकाला काम करण्यास सतत अडथळा येत आहे. शेजारच्या घरांमध्येही पाणी शिरत असून, येथून काही अंतरावरच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी होनखांबे यांचे निवासस्थान असतानाही या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. “वारंवार तक्रार करतो, तरी कोणी येत नाही. अधिकारी स्वतःच्या घराजवळच समस्या असताना का दुर्लक्ष करतात?” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

बार्शी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर सध्या मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. शहराला दररोज लाखो लिटर पाण्याची गरज असताना केवळ आठ दिवसांतून एकदा पुरवठा होतो. तरीही फुटलेल्या पाईपलाइनमुळे होणारी पाण्याची प्रचंड नासाडी थांबवण्यासाठी प्रशासन जागे होत नाही. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून, दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांत बार्शी नाका परिसरासह शहराजवळ अनेक ठिकाणी पाईपलाइन फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळी लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जाते, तरी दुरुस्तीला विलंब.

नागरिकांनी स्पष्ट केले की, “उन्हाळ्यात पाणी मिळणे कठीण झाले आहे. आठ दिवस वाट पाहावी लागते, तरी जे थोडेसे मिळते तेही फुटलेल्या पाईपमुळे वाया जाते. नगरपालिका आणि होनखांबे यांना याची काहीही पर्वा नाही.” या प्रकारामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने बार्शीकरांना मोठा आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

बार्शी नगरपालिकेने तातडीने पाईपलाइन दुरुस्त करावी, गॅरेजमुळे होणारा अडथळा दूर करावा आणि अधिकारी होनखांबे यांनी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा जनआंदोलन उभारण्याची तयारी नागरिकांनी दर्शवली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**