**सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा थैमान; वीज कोसळून एका महिलेसह ३४ मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी; पिकांचे मोठे नुकसान**

**सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा थैमान; वीज कोसळून एका महिलेसह ३४ मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी; पिकांचे मोठे नुकसान**

सातारा : राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत असताना सातारा जिल्ह्यातही सोमवारी दुपारीपासून मुसळधार वादळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटी, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. यामुळे वाई आणि खंडाळा तालुक्यांत वीज कोसळल्याच्या तीन घटना घडल्या. यात एका २९ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एकूण ३४ मेंढ्या ठार झाल्या. एक मेंढपाळ जखमी झाला. जिल्ह्यातील सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, जावळी, फलटण या तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वाई तालुक्यातील आसले गावाच्या पांडवनगर परिसरात दुपारी शेतात मेंढ्या चरणाऱ्या कळपावर वीज कोसळली. यात १६ मेंढ्या जागीच ठार झाल्या. मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ यांना विजेचा झटका बसून जखमी झाले. त्यांना वाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचबरोबर खंडाळा तालुक्यातील मोर्वे गावाच्या सोलाडी शिवारात अमोल धायगुडे यांच्या शेळ्यांच्या कळपावर संध्याकाळी वीज पडली. यात ९ शेळ्या ठार झाल्या. या दोन घटनांमुळे धायगुडे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

खंडाळा तालुक्यातील कराडवाडी (अंदोरी) येथे देखील सोनाली अजित कराडे (वय २९) ही महिला शेळ्या चारत असताना वीज कोसळल्याने जागीच ठार झाली. एकूण ३४ मेंढ्या-शेळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

खंडाळा तालुक्यातील भोळी परिसरात गारांचा पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, कांदा, हरभरा आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले. वाई, पाचगणी, शिरवळ महामार्ग परिसरातही वळवाचा पाऊस झाला. वाई शहरात रस्त्यांवर पाणी साचले, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. फलटण तालुक्यात आंब्यांच्या मोहरावर पावसाचा फटका बसून फळे गळून पडली. कोरेगाव तालुक्यात काढणीला आलेल्या पिकांना पाणी लागून नुकसान झाले.

जिल्ह्यातील शेतकरी या अवकाळी पावसाने हैराण झाले आहेत. पशुधन आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल