**मृत पुत्राच्या नंबरने बँक खाते रिकामे; शेतकऱ्याची २.५ लाखांची फसवणूक**
कळंबवाडी (आ) येथील ६५ वर्षीय शेतकरी परमेश्वर नामदेव रणदिवे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
रणदिवे यांनी २३ जून २०१७ रोजी आयडीबीआय बँकेच्या आगळगाव शाखेत खाते उघडले होते. त्यावेळी स्वतःकडे मोबाईल नसल्याने त्यांनी मुलगा सौरभ रणदिवे याचा मोबाईल क्रमांक बँकेशी लिंक केला होता. मात्र ४ सप्टेंबर २०२३ रोजी सौरभ यांचे निधन झाले. त्यानंतर हा मोबाईल क्रमांक बंद झाला होता.
६ ऑगस्ट २०२५ रोजी रणदिवे बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यावर खात्यातील रक्कम शून्य असल्याचे समजले. बँक स्टेटमेंट तपासताना मोबाईल क्रमांक दूरसंचार कंपनीने बंद करून दुसऱ्या व्यक्तीला दिल्याचे उघड झाले.
तपासात ४ सप्टेंबर २०२३ ते ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत फोनपे, गुगल पे सारख्या डिजिटल माध्यमातून रणदिवे यांच्या खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय २ लाख ५० हजार रुपये काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या फसवणुकीत समाधान काशीनाथ भिल्ल (पत्ता अज्ञात) याने मयत मुलाच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. प्राथमिक चौकशीतही त्याने रक्कम काढल्याचे पुरावे मिळाले असल्याने रणदिवे यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
बार्शी तालुका पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. डिजिटल बँकिंग आणि मोबाईल क्रमांक अपडेट न केल्यास अशा फसवणुकीचा धोका वाढतो, असे सांगत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या