**महाराष्ट्र राजकारणात 'मोठा भूकंप' होणार!** शिवसेना खासदार ज्योती वाघमारेंचं नांदेडमध्ये सूचक विधान; 'कुछ तो बडा होनेवाला है... ऑपरेशन टायगर की तुतारी?'*
**महाराष्ट्र राजकारणात 'मोठा भूकंप' होणार!** शिवसेना खासदार ज्योती वाघमारेंचं नांदेडमध्ये सूचक विधान; 'कुछ तो बडा होनेवाला है... ऑपरेशन टायगर की तुतारी?'*
**KDM NEWS प्रतिनिधी नांदेड, २८ मार्च २०२६:** महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी नांदेड दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना 'काही तरी मोठं घडणार' असं सूचक विधान केलं आहे. 'महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. मग तो ऑपरेशन टायगर असेल की ऑपरेशन तुतारी, हे योग्य वेळी सांगेल,' असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.
वाघमारे नांदेडच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी पत्रकारांनी 'काही जण शिवसेनेच्या संपर्कात आहेत' अशा चर्चेवर प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केलं. 'राजकारणात परफेक्ट टायमिंगला खूप महत्त्व असतं. ती वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला नक्की सांगू, काय काय होणार आहे आणि कोण सोबत येणार आहे,' असंही त्यांनी जोडलं.
हे विधान महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींशी जोडलं जात आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणात नाव येताच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय उलथापालथींच्या चर्चा रंगल्या होत्या.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचीही चर्चा सुरू आहे. २८ जानेवारीला झालेल्या या अपघाताची निष्पक्ष चौकशी होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं आहे. वाघमारे यांनी या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. 'सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या बहिणी आहेत. एका बहिणीची माया भावाबद्दल काय असते, ती शब्दात वर्णन करता येत नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक बहीण जी अजितदादांना भाऊ मानते, तिला प्रचंड वेदना होत असेल. मुख्यमंत्री फडणवीस आपला शब्द पाळतील आणि निष्पक्ष चौकशी होतील,' असं त्यांनी सांगितलं.
डॉ. ज्योती वाघमारे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षाविद आहेत. दलित समाजातून आलेल्या या नेत्याने एप्रिल २०२३ मध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्या पक्षाच्या प्रमुख प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जातात. नुकतेच त्यांना राज्यसभा उमेदवारी देण्यात आली होती.
सध्या महाराष्ट्रात 'ऑपरेशन टायगर' सारख्या मोहिमांची चर्चा रंगली आहे. शिंदे गटाकडून पक्ष बळकटीकरणासाठी नव्या नेत्यांना आणण्याची रणनीती असल्याचे सूतोवाच होत आहे. वाघमारेंचं विधान याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे. राजकीय वर्तुळात या विधानामुळे 'काही तरी मोठं घडणार' अशी चर्चा सुरू झाली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या