**बार्शीत डॉक्टर-आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध; कल्याण-डोंबिवली घटनेचे पडसाद**

**बार्शीत डॉक्टर-आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध; कल्याण-डोंबिवली घटनेचे पडसाद** 

**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा निषेध करत बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ व आयटक कामगार केंद्राने शनिवारी (११ जुलै) जोरदार आंदोलन केले. डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या निदर्शनात डॉक्टर, परिचारिका, ब्रदर्स व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

७ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत गर्भवती रुग्णाच्या नातेवाईकांसह नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी NICU बेडची मागणी करत रुग्णालयात धुमाकूळ घातला. उपलब्ध नसलेल्या बेडसाठी दबाव टाकत महिला डॉक्टर श्रुष्टी बाविस्कर व रेसिडेंट मेडिकल ऑफिसर वैभव साळुंखे यांच्यासह नर्स व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी म्हात्रे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, म्हात्रेसह काहींना अटक करण्यात आली आहे. मात्र, पीडित डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने दोन डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.

संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. “डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोणत्याही हल्ल्यांना आम्ही सहन करणार नाही. आरोपी नगरसेवकावर कठोर कारवाई करून त्याचे पद रद्द करावे,” अशी मागणी ठोंबरे यांनी केली. शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने कायदे करावेत, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

या वेळी आयटकचे जिल्हा सचिव कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, डॉ. सुरज सावंत, डॉ. स्वप्नील मुंढे, डॉ. आशुतोष लोहिया, डॉ. महेश शेळवणे, डॉ. सोनाली जगताप, डॉ. कराळे, प्रविण मस्तुद, शितल करडे आदींसह अनेक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. आंदोलकांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली.

ही घटना राज्यातील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडवून देणारी आहे. भारतीय वैद्यकीय संघटनेने (IMA) देखील निषेध व्यक्त करत सेवा बंदीचा इशारा दिला होता. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**