**प्रशासनाला जाग आली! ग्रामस्थांच्या अनोख्या आंदोलनानंतर साकत चौकातील ड्रेनेज पुलाची दुरुस्ती सुरू**
**प्रशासनाला जाग आली! ग्रामस्थांच्या अनोख्या आंदोलनानंतर साकत चौकातील ड्रेनेज पुलाची दुरुस्ती सुरू**
**KDM NEWS प्रतिनिधी पानगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर):** बार्शी–सोलापूर महामार्गावरील साकत चौकातील खंडोबा नगर परिसरात अनेक दिवसांपासून तुटलेल्या ड्रेनेज पुलाच्या स्लॅबमुळे निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरू झाले आहे. ग्रामस्थांनी खड्ड्यात झाड लावून केलेल्या आंदोलनानंतर प्रशासन आणि ठेकेदार कंपनीने तातडीने काम हाती घेतले.
साकत चौकातील हा ड्रेनेज पुलाचा स्लॅब तुटल्याने वाहतूक धोकादायक बनली होती. विशेषतः रात्रीच्या वेळी छोटे-मोठे अपघात होत होते. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या तरी दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. खड्ड्यात झाड लावून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि दुरुस्तीचे आदेश दिले.
सध्या काम युद्धपातळीवर सुरू असून, आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. पुलाच्या स्लॅबची पूर्ण दुरुस्ती करण्याचे काम वेगाने चालू आहे. काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, वेग मर्यादित ठेवावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या आंदोलनामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, केवळ डागडुजी न करता दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या