मला राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नाही : शरद पवार
राम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२४ होणार आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातील सर्व स्तरातील मान्यवर व्यक्ती हजेरी लावणार आहे. या सोहळ्यासाठी मोदी सरकारने जय्यत तयारी केली आहे.याच राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'मला राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. मात्र, मला सोहळ्यासाठी निमंत्रण मिळालं नसल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे.शरद पवार अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याबाबतही वक्तव्य केलं.
शरद पवार म्हणाले, 'इंडिया आघाडीची बैठक झाली, तेव्हा राहुल गांधी यांनी पदयात्रा केली. त्यानंतर दुसरी पदयात्रा काढण्यासाठी सूचना केली होती. त्यामुळे ते करत आहेत. तीन राज्याचा निकाल अपेक्षासारखा लागला नाही. पण आता लोक इंडिया आघाडीला पर्याय म्हणून स्वीकारतील. आम्ही एकत्र बसून जागावाटपाचा निर्णय घेऊ'.राम मंदिरावर शरद पवार काय म्हणाले?
'राम मंदिराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे, हे बाळासाहेबांच्या तोंडून ऐकलं आहे. मला राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. या मंदिरासाठी अनेकांचे योगदान आहे. मला राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण नाही. मी मंदिरात जात नाही. मंदिरात जाणे ही व्यतिगत बाब आहे. त्यासाठी निमंत्रणाची गरज नाही'.
भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करतंय का, यावर बोलताना शरद पवारांनी भाजपवर टीका केली. 'ते राजकरण करत आहे की व्यवसाय करत आहे? ते मला माहित नाही, अशी टीका पवारांनी केली.नाना पाटेकर यांच्यावर शरद पवार काय म्हणाले?
नाना पाटेकर हे खडकवासल्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, 'नाना पाटेकर निवडणूक लढवणार हे तुमच्याकडून ऐकत आहे. नाना पाटेकर यांचे माझे चांगले संबंध आहेत. त्यांनी मला अजून काही सांगितलं नाही'.