सुप्रीम कोर्टातच झाली मतमोजणी, भाजपला मोठा धक्का |
ग्रामपंचायत असो की लोकसभा निवकणूक सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. निवडणुकीनंतर मतमोजणी ही मजमोजणी केंद्रातच होते. मात्र, देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच मतमोजणी थेट कोर्टरूममध्ये झाली आहे.हो, तुम्ही बरोबर वाचलत. चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरप्रकारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने जुना निकाल रद्द करत नवीन निर्णय दिला आहे. यासाठी पहिल्यांदाच मतमोजणी सुप्रीम कोर्टाच्या कोर्टरुममध्ये करण्यात आली. याचा 20 मिनिटांचा व्हिडीओ देखील सरन्यायाधीशांनी दाखवला आहे.
चंदीगड महापौर निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने रचला इतिहास
चंदीगड महापौर निवडणुकीत पहिल्यांदाच मतमोजणी मतमोजणी केंद्रात न करता न्यायालयाच्या खोलीत (कोर्टरुम) झाली. न्याय देण्यासाठी कोर्टरूममधून महापौर निवडीची घोषणा करण्यात आली. जुना निकाल रद्द करत आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांना महापौर घोषित करण्यात आले आहे. CJI DY चंद्रचूड यांनी 20 मिनिटांचा व्हिडिओ सर्वांना दाखवला.
निवणूक अधिकाऱ्याला फटकारलं
सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान CJI DY चंद्रचूड यांनी निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांना विचारले की तुम्ही कॅमेराकडे का पाहत होता? यावर मसिह म्हणाले की, सभागृहा गोंधळ सुरू होता. नगरसेवक कॅमेरा-कॅमेरा ओरडत होते. ते असं का करतायेत हे पाहण्यासाठी मी तिकडे पाहिले. तुम्ही मतपत्रिकेवर खाडाखोड का करत होते? असा थेट सवाल सरन्यायाधीशांनी विचारला. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी मी स्वाक्षरी करतअसल्याचे सांगितले. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, पण तुम्ही खाडाखोड करताना दिसत आहात. ज्यावर अधिकारी म्हणाले की, कागदपत्रांमध्ये आधीच छेडछाड करण्यात आली होती. मी त्यांच्यावर खुण केली. या उत्तरावर डीवाय चंद्रचूड म्हणाले की, तुम्हाला तसे करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. CJI म्हणाले की, आम्ही उपायुक्तांना निष्पक्ष निवडणूक अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देऊ. नव्याने निवडणुका झाल्या पाहिजेत. देखरेखीसाठी न्यायिक अधिकारीही नेमावा.
सरन्यायाधीशांनी मागवले सर्व रेकॉर्ड
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल म्हणाले की, हायकोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी माझी सूचना आहे. मतपत्रिका आणि नोंदीही पाहिल्या पाहिजेत. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला सर्व रेकॉर्डसह अधिकारी पाठवण्यास सांगू. त्याची पाहणी करून पुढील आदेश देऊ. या प्रकरणावर मंगळवारी (20 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
सीजेआयने सुनावणीदरम्यान सांगितले की, रेकॉर्ड सुरक्षितपणे येथे पोहोचण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी. अधिकाऱ्यांनीही मतमोजणीचा संपूर्ण व्हिडिओ आमच्यासमोर सादर करावा. निवडणूक अधिकारी अनिल मसिह आमच्यासमोर आले. त्यांनी 8 मतपत्रिकांवर खाडाखोड केल्याचे मान्य केले. मतपत्रिका खराब झाल्याचे त्यांनी सांगितले.