पुणे सीआयडी ऑफिसबाहेर हालचालींना वेग; कराड समर्थकांची गर्दी, कारण काय?
पुणे सीआयडी ऑफिसबाहेर हालचालींना वेग; कराड समर्थकांची गर्दी, कारण काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या तपासाला सीआयडीने वेग दिला आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली असून, तीन आरोपी फरार आहेत. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून तपास करत आहेत. हत्येचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे.
या तपासादरम्यान पुणे येथील सीआयडी मुख्यालयाबाहेर हालचालींना वेग आला आहे. विशेषत: वाल्मिक कराड समर्थकांची गर्दी वाढली असून, कराड सरेंडर करण्याची चर्चा सुरू आहे. सीआयडीने त्यांच्यावर दबाव वाढवला असून, बीड जिल्ह्यात नऊ सीआयडी टीम कार्यरत आहेत, ज्यात सुमारे 150 अधिकारी आणि कर्मचारी तपास करत आहेत. यापूर्वी 100 हून अधिक लोकांची चौकशी केली गेली आहे.
वाल्मिक कराड यांच्याविरोधात सीआयडीने दबाव वाढवला आहे. पुण्यातील सीआयडी कार्यालयाच्या बाहेर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड समर्थकांची गर्दी दिसून येत आहे. कराड समर्थकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या विरोधात खोटे आणि चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, हा संपूर्ण प्रकरण राजकीय षडयंत्र आहे आणि शरद पवार यांचा धनंजय मुंडे यांच्याविरोधात कट आहे.
मुंडे-कराड समर्थकांनुसार, कराड यांना फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या विरोधात खंडणीचा आरोप सिद्ध झाला नसताना, चुकीच्या पद्धतीने तपास सुरू आहे. आज सीआयडी अधिकाऱ्यांना भेटून कराड यांच्याविरोधातील आरोप फेटाळले जातील, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
सर्व घटनाक्रमामुळे, बीड जिल्ह्यात व पुण्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे.