अमेरिकेत स्थायिक अभियंता पतीला पंढरपूर सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

अमेरिकेत स्थायिक अभियंता पतीला पंढरपूर सत्र न्यायालयाकडूनअटकपूर्व जामीन मंजूर

पंढरपूर, २८ फेब्रुवारी २०२५: अमेरिकेत स्थायिक असलेल्या अभियंता पतीला पत्नीने भारतात दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणात पंढरपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश श्री. एस. बी. देसाई यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी हा आदेश दिला.

प्रकरणाचा तपशील:

पत्नी धनलक्ष्मी (बदललेले नाव) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात पती गंधर्व (बदललेले नाव) आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ, ४०६, ४२०, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, २०१८ मध्ये विवाहानंतर धनलक्ष्मी शहापूर, इचलकरंजी येथे सासरी राहू लागली. २०१९ मध्ये ती पतीसोबत अमेरिकेत गेली आणि एम.एस.चे शिक्षण घेतले. शिक्षणाचा खर्च सासरच्या मंडळींनी करायचे मान्य केले होते, मात्र ४० लाख रुपये लागणार असल्याने त्यांनी नकार दिला. माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकून तिचा मानसिक व आर्थिक छळ करण्यात आला. ऑगस्ट २०२२ मध्ये तिचे पासपोर्ट, मोबाईल, लॅपटॉप आणि कागदपत्रे काढून घेऊन तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला.

न्यायालयीन प्रक्रिया:

गंधर्व फरार घोषित झाल्याने पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. तो अमेरिकेत असल्याने आणि अटकपूर्व जामीन मंजूर नसल्याने भारतात येण्यास घाबरत होता. त्यामुळे त्याने पंढरपूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सरकारी पक्षाने या अर्जाला विरोध केला.

अर्जदाराच्या वतीने अॅड. प्रशांत शेटे यांनी युक्तिवाद केला की, अर्जदार बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) आणि एम.एस. (इलेक्ट्रिकल्स) पदवीधर असून पत्नीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च त्याने केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चार महिन्यांनी अर्जदार अमेरिकेत गेला असल्याने त्याला फरार म्हणता येणार नाही. परदेशात स्थायिक भारतीय नागरिकाला अटकपूर्व जामीन मिळण्याचा अधिकार आहे. अटक न झाल्यास अर्जदाराच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो आणि व्हिसा, पासपोर्टसंबंधी अडचणी येऊ शकतात.

न्यायालयाने या युक्तिवादाचा स्वीकार करून गंधर्वचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात अर्जदाराच्या वतीने अॅड. प्रशांत शेटे, अॅड. उदय बागल (पंढरपूर) आणि अॅड. प्रणाली शेटे यांनी काम पाहिले. भारतात अशा मोजक्या प्रकरणांपैकी हे एक आहे, ज्यात परदेशात स्थायिक व्यक्तीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

न्यायालयाने उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे:

१. सी.आर.पी.सी. कलम २९९ अन्वये फरार घोषित झालेल्या व्यक्तीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करता येईल का?
२. परदेशात स्थायिक व्यक्तीचा भारतात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याचा पंढरपूर सत्र न्यायालयास अधिकार आहे का?
३. गुन्हेगार परदेशात स्थायिक असल्यास त्याला अटकेची भीती कशी असू शकते?

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल