प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांना शेतकऱ्यांचा घेराव, सामूहिक लोटांगण घालून महामार्ग रद्द करण्याची मागणी
प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांना शेतकऱ्यांचा घेराव, सामूहिक लोटांगण घालून महामार्ग रद्द करण्याची मागणी
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २५ एप्रिल : महामार्ग रद्द करण्यासाठी बार्शी तालुक्यात शेतकरी आक्रमक बार्शी तालुक्यात प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. या महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांची उपजिविका धोक्यात येणार असल्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन छेडले आहे.
शुक्रवारी (२५ एप्रिल) प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. शेकडो शेतकरी प्रांत कार्यालयावर एकत्र आले आणि त्यांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर सामूहिक लोटांगण घालून आपली व्यथा मांडली. "गोळ्या घाला पण महामार्ग रद्द करा" अशा संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शक्तिपीठ महामार्गामुळे आमची जमीन जाणार आहे. योग्य मोबदला नाही, पुनर्वसन नाही. आम्ही हे प्रकल्प नाकारतो.” आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनही प्रांताधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, जर प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेऊन पुढील लढा उभारला जाईल.
संपूर्ण बार्शी तालुक्यात सध्या या प्रश्नावर तणावाचे वातावरण असून, शेतकरी महामार्गाच्या विरोधात एकवटले आहेत.