रुग्णालयातील बोगस डॉक्टरला अटक; बनावट पदवी प्रकरण उघड

 रुग्णालयातील बोगस डॉक्टरला अटक; बनावट पदवी   प्रकरण उघड

KDM NEWS प्रतिनिधी मुंबई : नानावटी रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अतुल वानखेडे याला बनावट वैद्यकीय पदव्यांच्या आधारे रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी अटक केली आहे. वानखेडेने युनिव्हर्सिटी ऑफ सेशल्स या २०१० मध्येच बंद झालेल्या विद्यापीठाची २०११ मध्ये पदवी मिळविल्याचा खोटा दावा करत मुंबईतील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये सेवा दिली होती. सोमवारी त्याला शिवडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

२४ वर्षीय अविनाश समिंदर या फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्याने पाठदुखीच्या उपचारासाठी वानखेडे यांच्याकडे भेट दिली होती. वानखेडेने त्याला चुकीचे सल्ले दिल्याने त्याच्या दुखण्यात वाढ झाली. यामुळे संशयित झालेल्या अविनाशने आणि भीम आर्मीचे कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी वानखेडेची पार्श्वभूमी तपासली असता, त्याच्या वैद्यकीय पदव्यांबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

पोलिस तपासात उघड झाले की, वानखेडेने प्रितीव्राज रतनलाल भाटिया यांचा जुना पत्ता वापरून बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट तयार करून आपल्या वैद्यकीय पात्रतेचा खोटा आधार तयार केला होता. तसेच पुण्यातील केईएम रुग्णालयानेही वानखेडेला कोणतीही पदवी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने २०१५ मध्येच त्यांच्या पदव्यांबाबत शंका व्यक्त केली होती.

या गंभीर प्रकारानंतर अविनाश समिंदरने वरळी पोलिस ठाण्यात वानखेडेविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच कारवाई करत त्याला अटक केली असून त्याच्या विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि सरकारी रेकॉर्डमध्ये खोटी माहिती सादर करणे या गुन्ह्यांखाली कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानखेडेची सर्व बनावट पदवी प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही रुग्णालयांमध्ये त्याने सेवा दिल्याचे पुरावेही मिळवले जात आहेत.

या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली असून, रुग्णांनी डॉक्टरांची पार्श्वभूमी तपासण्याचे महत्व अधोरेखित झाले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल