**पुण्यात शिवसृष्टीजवळ लघुशंका प्रकरणी वाद; दोघांना पोलिस ठाण्यात आणले**
**पुण्यात शिवसृष्टीजवळ लघुशंका प्रकरणी वाद; दोघांना पोलिस ठाण्यात आणले**
**KDM NEWS प्रतिनिधी**पुणे, 31 मे 2025: पुण्यातील शिवसृष्टी परिसरात शनिवारी पहाटे लघुशंका प्रकरणी वाद उफाळला असून, याप्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तक्रार दाखल करणारे नयनाथ तुकाराम अमराळे (वय 23) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नवले ब्रिजजवळ घडली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी करत आहेत.
नयनाथ अमराळे हे शिक्षण घेत असून, शनिवारी पहाटे ते आणि त्यांचा रूममेट अभिजीत सितापुरे नवले ब्रिजवरून घरी परतत होते. यावेळी शिवसृष्टीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन चारचाकी वाहने उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यापैकी एका गाडीजवळ एक पुरुष व्यक्ती सूचना फलकाजवळ लघुशंका करताना दिसली, तर त्यांच्यासोबत एक महिला उभी होती. या घटनेचे दृश्य स्थानिक तरुण अक्षय गायकवाड याने रेकॉर्ड केल्याचे समजते.
अमराळे आणि सितापुरे यांनी संबंधित व्यक्तींना याबाबत विचारणा केली असता, त्या पुरुषाने स्वतःचे नाव अमोल अरुण कुलकर्णी (वय 59, रा. धायरी, पुणे) आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचे नाव स्नेहा अमोल कुलकर्णी (वय 57) असे सांगितले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले.
सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी यांनी सांगितले की, प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
स्थानिकांनी या प्रकरणी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून, लवकरच याबाबत स्पष्टता येणे अपेक्षित आहे.