**अंबाजोगाईत ११५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा**

**अंबाजोगाईत ११५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा** 

**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे ११५० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्यात येईल. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम उच्च दर्जाचे आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. हे महाविद्यालय देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असून, त्याला आदर्श संस्थेचे स्वरूप देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

या महाविद्यालयाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी वेगवान कारवाई करावी. चांगला आराखडा तयार करून ठोस पावले उचलावीत. हे रुग्णालय मराठवाड्यातील लोकसंख्येसाठी दिलासा ठरेल. स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची नवीन संधी मिळेल आणि ग्रामीण रुग्णांना तज्ज्ञ सेवा उपलब्ध होईल.

बैठकीत पवार यांनी सांगितले, महाविद्यालयासाठी नवीन मास्टर प्लॅन तयार करावा. त्यात आधीच्या पूर्ण झालेल्या कामांचा समावेश करून आधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी सेवा आणि उत्कृष्ट वैद्यकीय साधने असावीत. येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव सादर करावा. सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींचा नियोजनपूर्वक वापर करावा आणि सर्व कामे लवकर पूर्ण करावीत. या संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल.

महाविद्यालयात पदवीपूर्व अभ्यासक्रमाची क्षमता १५० आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमांनुसार पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि वित्त विभागांची संयुक्त बैठक लवकर घेण्यात येईल. कामांचा प्राधान्यक्रम ठरवून आराखडा तयार करावा. उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी तज्ज्ञ आर्किटेक्ट नेमावा. महाविद्यालयाच्या १०० एकर जमिनीवरील अतिक्रमणे काढावीत आणि परिसराला सुरक्षा भिंत बांधावी. प्राप्त निधीचा वापर अत्यावश्यक आणि दर्जेदार कामांसाठी करावा. औषधांबाबत कोणत्याही तक्रारी येऊ नयेत याची काळजी घ्यावी. सुरू असलेले बाह्यरुग्ण विभाग, मुला-मुलींच्या वसतिगृहांचे बांधकाम उच्च दर्जाचे असावे, असेही निर्देश देण्यात आले.

बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए., संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते. यापूर्वी मे महिन्यात अंबाजोगाईत झालेल्या आढावा बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, नमिता मुंदडा आदींनी रुग्णालय विस्तारीकरण आणि नवीन प्रकल्पांची पाहणी केली होती.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**