**सोलापूर राजकारणात भूकंप: राष्ट्रवादीचे चार माजी आमदारांसह शिंदे बंधूंचा भाजपमध्ये प्रवेश; बालेकिल्ला हादरला**
**सोलापूर राजकारणात भूकंप: राष्ट्रवादीचे चार माजी आमदारांसह शिंदे बंधूंचा भाजपमध्ये प्रवेश; बालेकिल्ला हादरला**
**KDM NEWS प्रतिनिधी** दि. २९ ऑक्टोबर २०२५**: सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला असून, चार माजी आमदारांसह अनेक नेत्यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला. या मेगा भरतीमुळे राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी भाजपने हा मास्टरस्ट्रोक रचला असून, मोहोळ तालुक्यातील समरूपता नव्याने लिहिली जाणार आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. सोहळ्यात दीडशेपेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले.
प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, विक्रांत पाटील, यशवंत माने यांचा समावेश आहे. तसेच, माजी युवा काँग्रेस राज्याध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांनीही भाजपचा झेंडा स्वीकारला. माढा तालुक्यातील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधूही पक्षप्रवेशात सामील झाले. याशिवाय, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनीही भाजपत प्रवेश केला. सोलापूरच्या राजकारणात प्रभाव आहे , ज्यात राजन पाटील आणि यशवंत माने हे मोहोळ मतदारसंघातील प्रमुख चेहरे आहेत, तर विक्रांत पाटील यांचा राष्ट्रवादीत दीर्घ अनुभव आहे.
या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची सोलापूरमधील पकड कमकुवत झाली आहे. मोहोळ तालुक्यातील तीन माजी आमदारांच्या पक्षबदला मुळे स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला फायदा होण्याची चिन्हे आहेत. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे या प्रक्रियेचे मुख्य शिल्पकार ठरले असून, त्यांचा 'गेम चेंजर' प्रभाव लक्षात येतो. भाजपकडून याबाबत अधिकृत निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, "सोलापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने हे नेते उपयुक्त ठरतील."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपची ही रणनीती यशस्वी झाली असून, राज्यातील स्थानिक निवडणुकांसाठी सोलापूरमध्ये पक्षाची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीकडून या घटनेवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या