**संस्कारी युवक घडले तरच चांगला समाज : न्यायाधीश राऊत**
**संस्कारी युवक घडले तरच चांगला समाज : न्यायाधीश राऊत**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. ३१ (प्रतिनिधी) :** प्रत्येक घरात संस्कारी मुलगा तयार झाला तर नक्कीच चांगला समाज निर्माण होईल. जास्त कायदे असणे हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही. लोकांनी आपसातील मतभेद लोकअदालतीत मिटवून पैशाची व वेळेची बचत करावी, असे आवाहन सहाय्यक दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पी. व्ही. राऊत यांनी केले.
बार्शी तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने चिखर्डे (ता. बार्शी) येथे आयोजित फिरत्या लोकअदालत व कायदे जनजागृती शिबिरात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येकाने मानसिकता बदलली व नियम-कायद्याने वागले तरच सुसंस्कृत समाज घडेल. युवक संस्कारी नसतील तर भविष्यात गुन्हेगारी वाढेल.
प्रस्ताविकात वकील संघ अध्यक्ष विधीज्ञ आर. एन. गुंड म्हणाले, समोपचाराने दिवाणी खटले मिटवल्यास लोकांची वेळ-पैसा वाचेल व न्यायालयावरील ताण कमी होईल. यासाठी असे उपक्रम राबवले जातात.
विधीज्ञ अक्षय पाटील, पांडुरंग घोलप, संजय कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विधीज्ञ उषा पवार, अभिजित कदम, अमित कोंढरे, बापू देवकर, निशांत मोहिते, कोकिळा जंगले, अंबिका परिहार, ग्रामविकास अधिकारी माने उपस्थित होते. यशासाठी न्यायालयीन कर्मचारी, पांगरी पोलीस व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या