**बार्शी मार्केट यार्डात अडत व्यापाऱ्याची ११.६९ लाखांची फसवणूक; मुनीम सागर फपाळवर विश्वासघाताचा गुन्हा दाखल**

**बार्शी मार्केट यार्डात अडत व्यापाऱ्याची ११.६९ लाखांची फसवणूक; मुनीम फपाळवर विश्वासघाताचा गुन्हा दाखल** 

**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका नामांकित अडत व्यापाऱ्याच्या नावाने तब्बल ११ लाख ६९ हजार ४७० रुपयांचा भुसार माल परस्पर खरेदी करून तो माल गायब करणाऱ्या मुनीमावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात विश्वासघात व अपहाराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २६ एप्रिल २०२५ ते २ नोव्हेंबर २०२५ या सुमारे सात महिन्यांच्या कालावधीत घडला.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुनीमाचे नाव सागर लक्ष्मण फपाळ (वय ३०, रा. फपाळवाडी, ता. बार्शी) असे आहे. तर फिर्यादी व्यापारी सचिन देविदास मडके (वय ४२, रा. दत्तनगर, बार्शी) हे मार्केट यार्डातील प्लॉट क्रमांक ११२ येथे ‘सचिन मडके अडत’ नावाने उडीद, तूर, चिंच आदी भुसार मालाचा अधिकृत परवानाधारक अडत व्यापारी आहेत.

सचिन मडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सागर फपाळ हा २०१६ पासून त्यांच्या दुकानात मुनीम म्हणून काम करीत होता. खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार, बाजारातील माल खरेदीचे अधिकार त्याच्याकडे होते. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुकानातील स्टॉक तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात तूट आढळून आली. त्यानंतर १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान पूर्ण स्टॉक व खरेदी पावत्यांची पडताळणी केली असता धक्कादायक बाब समोर आली.

मार्केट यार्डातील गाळा क्रमांक ५८ मधील अन्नपूर्णा ट्रेडिंग कंपनीकडून २६ एप्रिल ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उडीद, तूर, चिंच आदी भुसार मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याच्या पावत्या आढळल्या. ही खरेदी सागर फपाळ यानेच केली होती आणि रक्कम सचिन मडके यांच्या खात्यातील चेकद्वारे अन्नपूर्णा ट्रेडिंग कंपनीला अदा करण्यात आली होती. मात्र हा माल सचिन मडके यांच्या गोदामात कधीच पोहोचलाच नाही.

अन्नपूर्णा ट्रेडिंग कंपनीचे मालक शंतनू सागर रोडे व मुनीम शुभम काळे यांनी पोलिसांना दिलेल्या जबान्यात सांगितले की, सागर फपाळ हाच स्वतः माल घेऊन गेला होता आणि चेकद्वारे पूर्ण रक्कमही भरली होती. मात्र तो माल व्यापाऱ्यांच्या गोदामात न नेता फपाळ याने परस्पर विक्री करून ११ लाख ६९ हजार ४७० रुपयांचा अपहार केला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सचिन मडके यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक झालटे हे या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. बाजार समिती परिसरात या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. विश्वासातील कर्मचाऱ्याने केलेल्या या विश्वासघातामुळे अडत व्यवसायातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**