**बार्शी तालुक्यात दिवसा घरफोड्यांचा धडाका; एकाच दिवशी अलिपूर आणि पानगावमध्ये १२ लाखांहून अधिकचे दागिने लंपास**
**बार्शी तालुक्यात दिवसा घरफोड्यांचा धडाका; एकाच दिवशी अलिपूर आणि पानगावमध्ये १२ लाखांहून अधिकचे दागिने लंपास**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी ** बार्शी तालुक्यात गुरुवार १३ नोव्हेंबर रोजी दिवसाढवळ्या घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटनांनी परिसर हादरला. अलिपूर व पानगाव या दोन गावांत चोरट्यांनी शिक्षक दाम्पत्यासह एका शेतकऱ्याच्या घराला टार्गेट करत एकाच दिवशी तब्बल १२ लाख १४ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. दोन्ही ठिकाणी घराची कुलपे तोडून चोरट्यांनी अगदी निर्धास्तपणे घरांची झडती घेतली आणि मौल्यवान वस्तूंच्या पेट्या रिकाम्या केल्या.
**अलिपूर येथील घटना : शिक्षक दाम्पत्याचे ५ लाख ६४ हजारांचे दागिने गायब**
अलिपूर येथील गुंड प्लॉट भागात राहणारे प्रशांत शहाजी गुंड (वय ४३) आणि त्यांची पत्नी राणी प्रशांत गुंड हे दोघेही शिक्षक आहेत. दोघे सकाळी शाळेत गेल्याने घर बंद होते. सकाळी ९.४५ ते दुपारी ३.३० या सुमारे साडेपाच तासांच्या कालावधीत चोरट्यांनी घराच्या सेफ्टी डोअरचे तसेच लाकडी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले.
घरात प्रवेश केल्यावर हॉलमधील कपाटे, शोकेस, बेडरुममधील लोखंडी कपाटाचे ड्रॉवर उघडून चोरट्यांनी व्यवस्थित शोधाशोध केली. बेडरुममधील दागिन्यांची लोखंडी पेटी पूर्णपणे रिकामी केली. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ११ तोळे सोन्याचे गंठण, नेकलेस सेट, झुमके, वेल, चेन, कंगण, पेंडल, तसेच चांदीचे पैंजण, करदोडे आदींचा समावेश आहे. एकूण किंमत ५ लाख ६४ हजार रुपये आहे.
घरी परतल्यानंतर दाम्पत्याला घराची अवस्था पाहून धक्काच बसला. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात प्रशांत गुंड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
**पानगाव येथील घटना : शेतकऱ्याच्या घरातून ६ लाख ५० हजारांचे दागिने चोरी**
त्याच दिवशी पानगाव येथेही दुसरी मोठी घरफोडी उघडकीस आली. बापू भिमराव गाडे (वय ५२) हे शेतकरी सकाळी १०.३० वाजता घर बंद करून बाहेर गेले होते. सायंकाळी ५.३० वाजता घरी परतले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले.
चोरट्यांनी कपाटातील सर्व दागिन्यांच्या पेट्या उघडून मौल्यवान दागिने पळवले. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे फुलझुबे, काळ्या मण्याची पोत, लक्ष्मी हार, सोन्याच्या साखळ्या व दागिने, वेल, सुटे मणी, दोन अंगठ्या, चांदीचे जोडवे आणि कडे आदींचा समावेश आहे. एकूण किंमत ६ लाख ५० हजार रुपये आहे.
बापू गाडे यांच्या तक्रारीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे.
**दोन गावांत दहशत; पोलिसांचा तपास सुरू**
एकाच दिवशी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांत अशा धाडसी घरफोड्या झाल्याने अलिपूर आणि पानगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी घरफोडी दिवसाच्या वेळी झाली असून चोरटे घरात बराच वेळ थांबल्याचे पुरावे मिळत आहेत.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही घटनांचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, फिंगरप्रिंट तज्ज्ञांची टीम, श्वान पथक आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांना शंका आहे की, दोन्ही घटना एकाच टोळक्याच्या असण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात सलग होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गावकरी रात्री गस्त घालण्याची तयारी करत असून पोलिसांना अधिक गस्त वाढवण्याची मागणी करत आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या