**बार्शीला बंधुआ मजुरीचा धक्कादायक प्रकार; झारखंडची महिला व चार अल्पवयीन मुले तीन वर्षांपासून डांबून, आरोपी शेतकऱ्यावर बालमजुरी-मानव तस्करीचे गुन्हे दाखल**
**बार्शीला बंधुआ मजुरीचा धक्कादायक प्रकार; झारखंडची महिला व चार अल्पवयीन मुले तीन वर्षांपासून डांबून, आरोपी शेतकऱ्यावर बालमजुरी-मानव तस्करीचे गुन्हे दाखल**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी** २४ नोव्हेंबर २०२५**बार्शी तालुक्यातील चुंब (खडकोनी रोड) येथे एका शेतकऱ्याने झारखंड राज्यातील गरिब कुटुंबाला बंधुआ मजूर म्हणून तीन वर्षांपासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. यात एक महिला व तिची चार अल्पवयीन मुले (वय ९ महिने ते १० वर्षे) यांना शेतात व घरात सक्तीने राबवले जात होते. आरोपी शेतकऱ्याने त्यांना पगार दिला नाही, जेवण-पाणी पुरेसे दिले नाही, मुलांना शाळेत पाठवले नाही आणि मूळ गावी परत जाऊ दिले नाही, असे फिर्यादीत नमूद आहे.
झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील रामप्रवेश परहिया यांनी २३ नोव्हेंबर रोजी राज्य स्थलांतरित नियंत्रण कक्षाकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली. तक्रारीत म्हटले होते की, त्यांची पत्नी सविता देवी (आधार क्र. ३१७३९५३३०६७१) व चार मुले – आयुष कुमार (वय १०), पूनमकुमारी (वय ८), प्रीती कुमारी (वय ५) व पियुष कुमार (वय ९ महिने) यांना बंधुआ मजुरी, बालमजुरी व मानव तस्करीतून मुक्त करावे.
तक्रार प्राप्त होताच सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या आदेशाने कामगार निरीक्षक गणेश भगरे यांच्या पथकाने सोमवारी सकाळी चुंब येथे धाड टाकली. पथकात कामगार विभागाचे नीलेश येलगुंडे, सोमीनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकूर, बार्शी पोलीस ठाण्याचे पोना चौधरी (बॅ. नं. ५९२), मपोहेको पवार (बॅ. नं. ६८०), मंडळ अधिकारी अतुल आलेवार, ग्राम महसूल अधिकारी अमृता सुरवसे व मंडळसेवक शहाजी कोतमिरे यांचा समावेश होता.
पथकाने आरोपी झाकीर हुसेन इलाही सय्यद (रा. चुंब, खडकोनी रोड) याच्या शेतातील पत्राशेडमध्ये सविता देवी व चार मुले सापडली. पंचांसमोर सविता देवी यांनी सांगितले की,
“आम्ही २०२२ पासून येथे आहोत. पगार काहीच मिळाला नाही. पुरेसे जेवण मिळत नाही. मूळ गावी जायचा प्रयत्न केला तर ‘मुलांना याच ठिकाणी सोडून एकटी जा’ अशी धमकी मिळाली. गावातील बचतगटाचे कर्ज आम्ही फेडत आहोत, ते पूर्ण होईपर्यंत काम करावे लागेल अशी सक्ती केली. मुलांना शाळेत पाठवले नाही, घर व शेताबाहेर जाऊ दिले नाही.”
मुलांना घरातील भांडी घासणे, शेण काढणे, झाडलोट अशी कामे करायला लावली जात होती. १०, ८ व ५ वर्षांच्या तीन मुलांना तर ९ महिन्यांच्या बाळालाही आईसोबत सक्तीने ठेवले होते.
पथकाने घटनास्थळी पंचनामा केला व सविता देवी व चार मुलांना ताब्यात घेऊन त्यांना मुक्त केले. बार्शी पोलीस ठाण्यात कामगार निरीक्षक गणेश भगरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी झाकीर हुसेन इलाही सय्यद याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२), १२७(४), १४६ तसेच वेठबिगार निर्मूलन कायदा कलम १६, १८ व बालकामगार प्रतिबंधक कायदा कलम १४(१), ३ अशी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सविता देवी व चार मुलांना तात्काळ वैद्यकीय तपासणी व समुपदेशनासाठी पाठवण्यात येत असून, त्यांना झारखंडला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन व कामगार विभागाकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांवर होणाऱ्या अत्याचारांचा हा गंभीर प्रकार मानला जात आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या