**लिपिकाला थकीत पगार काढून देण्यासाठी २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात**
**लिपिकाला थकीत पगार काढून देण्यासाठी २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात**
**KDM NEWS प्रतिनिधी**इंदापूर (जि. पुणे) :** मालोजीराजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), फलटण-इंदापूर येथील प्रमुख लिपिक अनमोल शिवाजी शिंगे (वय ५३, रा. राजवेली, ता. इंदापूर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे विभागाने रंगेहाथ पकडले. वसतिगृह अधीक्षकाचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ असे तीन महिन्यांचे थकीत वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात त्याने प्रथम तीन हजार रुपये लाच मागितली होती. नंतर दोन हजार रुपयांवर तो तयार झाला आणि सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर) दुपारी २.४८ वाजता संस्थेच्या कार्यालयात ही रक्कम स्वीकारताच एसीबीने त्याला ताब्यात घेतले.
तक्रारदार हे मालोजीराजे आयटीआयमध्ये वसतिगृह अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले होते. ते वेतन काढून देण्यासाठी आणि पुढे कामात सहकार्य करण्यासाठी प्रमुख लिपिक अनमोल शिंगे यांनी वारंवार तीन हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास पुढील सर्व कामात अडथळे निर्माण करू, अशी धमकीही दिली. अखेर कंटाळून तक्रारदारांनी १९ नोव्हेंबर रोजी पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली.
तक्रार आल्यानंतर एसीबीने त्याच दिवशी (१९ नोव्हेंबर) संस्थेच्या कार्यालयात गुप्त पडताळणी केली. त्या वेळी शिंगे याने थकीत वेतन आणि पुढील सहकार्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितल्याचे व त्याची स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे सिद्ध झाले.
त्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदारांनी शिंगे यास दोन हजार रुपये दिल्यानंतर एसीबी पथकाने त्याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पंचासमोर ही कारवाई पूर्ण झाली. शिंगे याच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे (सापळा अधिकारी) व पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर (तपास अधिकारी) यांच्या पथकाने केली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या