**बार्शी बसस्थानकावर पुन्हा चोरी : महिलेच्या पर्समधून तीन तोळे सोने व १५०० रुपये लंपास**
**बार्शी बसस्थानकावर पुन्हा चोरी : महिलेच्या पर्समधून तीन तोळे सोने व १५०० रुपये लंपास**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी ** (जि. सोलापूर) : बार्शी शहरातील राज्य परिवहन बसस्थानक प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मंगळवारी (दि. २५ नोव्हेंबर) दुपारी सव्वाचार ते साडेचार वाजेच्या सुमारास बसस्थानकातच गर्दीचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधून तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि १५०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून उघडकीस आली आहे.
फिर्यादी आश्विनी कपील हिंगमिरे (वय ३४, रा. लक्ष्मीनगर, बार्शी) या बार्शी येथील खासगी कर्करोग रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती हे बार्शी येथील ब्लड बँकेत कर्मचारी आहेत. मंगळवारी दुपारी त्या आपल्या आईसोबत माहेरच्या गावी कळंब येथे जाण्यासाठी बार्शी एसटी बसस्थानकात आल्या होत्या.
बसमध्ये सीट मिळाल्यानंतर आश्विनी यांनी आईची बॅग (पर्स) तपासली असता बॅगेची झिप उघडी असल्याचे व त्यातील दोन लहान लाल-काळ्या रंगाच्या पर्स पूर्णपणे गायब असल्याचे लक्षात आले. या दोन्ही छोट्या पर्समध्ये एक ३ तोळ्यांचे सोन्याचे गंठण (सुमारे २.९० ते ३ तोळे), एक १ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, तसेच १५०० रुपये रोख रक्कम होती. एकूण अंदाजे मुद्देमाल दीड लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
बस थांबवून परत प्लॅटफॉर्मवर येऊन सर्वत्र शोध घेतला, सीसीटीव्ह कॅमेऱ्याजवळ चौकशी केली; परंतु काहीही हाती लागले नाही. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने हात साफ केल्याचे स्पष्ट झाले. बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी त्यांची संख्या अपुरी असल्याने व देखभाल-दुरुस्तीचा अभाव असल्याने चोरटे बिनधास्त फिरतात, असे प्रवासी सांगतात.
या घटनेमुळे बार्शी बसस्थानक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या चोरी-लंपासाच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. “दिवसाढवळ्या बसस्थानकात चोरी होत असेल तर मग आम्ही कुठे सुरक्षित आहोत?” असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसस्थानकात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
बार्शी बसस्थानकात गेल्या दोन-तीन महिन्यांत पर्स चोरी, मोबाईल चोरी, बॅग लंपास अशा सुमारे १२ ते १५ घटना घडल्या असून त्यापैकी फक्त दोन-तीन प्रकरणांत पोलिसांना यश मिळाले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास उरला नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकात तातडीने अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेसा प्रकाशयोजना, स्वतंत्र महिला कक्ष आणि सातत्याने गस्त घालणारे पोलीस पथक नेमावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या