**बार्शीतील तरुणाई अवैध धंदे व व्यसनाच्या गर्तेत; तीन वर्षांत ५० हून अधिक तरुणांनी व्यसनासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारला**

**बार्शीतील तरुणाई अवैध धंदे व व्यसनाच्या गर्तेत; तीन वर्षांत ५० हून अधिक तरुणांनी व्यसनासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला** 

**KDM NEWS बार्शी प्रतिनिधी** बार्शी : एकीकडे बार्शी शहरातील उद्योग-व्यवसायाची होत चाललेली दयनीय अवस्था, बेरोजगारीने ग्रासलेले सुशिक्षित तरुण, नवीन व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल आणि जागेचा अभाव अशी अनेक संकटे तरुणांसमोर उभी आहेत. दुसरीकडे मटका, क्रिकेट सट्टा, चक्री गेम, गुटखा, गांजा, ब्राउन शुगरसारखी ड्रग्स, अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांचे जाळे शहरात तालुक्यात घट्ट विणले गेले आहे. या अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या तीन वर्षांत व्यसनासाठी कर्जबाजारी झालेल्या सुमारे ५० ते ५५ तरुणांनी आत्महत्येचा मार्ग निवडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, गल्ल्या आणि उपनगरांमध्ये मटका केंद्रे बिनदिक्कत चालू आहेत. गुटखा आणि गांजा तर अगदी किराणा दुकानांपासून ते चहा टपऱ्यांवरही सहज मिळतो. क्रिकेट सट्टा आणि ऑनलाइन चक्री गेम्सच्या आहारी गेलेले अनेक तरुण रात्रंदिवस मोबाईलवर खेळताना दिसतात. अवैध दारूचे टेम्पो भरून साठे शहरात येत असल्याचे उघड आहे. डुप्लिकेट गुटखा आणि नवीन प्रकारची ड्रग्सही आता बार्शीमध्ये मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत.

या सर्व अवैध धंद्यांमागे राजकीय आश्रय असल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. “पोलिसांना सर्व काही माहिती आहे, पण कारवाई होत नाही. उलट जे कार्यकर्ते या विरोधात आवाज उठवतात, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात,” असे गंभीर आरोप सामाजिक संघटनांकडून होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे अवैध धंद्यांचे केंद्र म्हणून बार्शीची ओळख निर्माण झाली असून, “दोन नंबरची राजधानी” असे नावही या शहराला पडले आहे.

गेल्या काही वर्षांत बार्शी पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी दोन-तीन वर्षे सेवा बजावून बदली होऊन जातात, पण अवैध धंद्यांवर अंकुश का येत नाही, हा प्रश्न बार्शीकरांना सतावतो आहे. राजकीय दबाव, पोलीस आणि अवैध धंदेवाल्यांमधील साटेलोटे की कायदेशीर यंत्रणेची हतबलता? याचे उत्तर कुणीही देऊ शकत नाही.

सध्या बार्शी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १, २ आणि ३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने ड्राय-डे जाहीर केले आहेत. मात्र या कालावधीतच अवैध दारूचे मोठ्या प्रमाणात साठे शहरात दाखल झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. टेम्पो आणि छोट्या वाहनांमधून दारूचे जख्खड शहरात आणले जात असल्याचे नागरिक सांगतात.

सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांची मागणी स्पष्ट आहे – “राजकारण्यांनी निवडणुकीत फक्त आरोप-प्रत्यारोप करू नयेत. बार्शी शहराची अवैध धंद्यांमुळे होणारी बदनामी थांबवा. तरुणांना व्यसन आणि अवैध मार्गापासून वाचवा. पोलिसांवर दबाव आणून कारवाई करा. अन्यथा बार्शीचे भविष्य अंधारात जाणार आहे.”

बार्शीकरांच्या मनात एकच प्रश्न घोळतो आहे – एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असताना पोलीस आणि प्रशासन मौन का आहे? हा मौन किती दिवस कायम राहणार? आणि याच मौनामुळे बार्शीचा तरुणवर्ग कधी बाहेर पडणार?


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**