**हॉटेल मालकाचा क्रूर चेहरा उघड; मॅनेजरला निर्वस्त्र करून लोखंडी पाईपने बेदम मारहाण, धमकी अन् व्हिडीओ व्हायरल केल्याने अटक**
**हॉटेल मालकाचा क्रूर चेहरा उघड; मॅनेजरला निर्वस्त्र करून लोखंडी पाईपने बेदम मारहाण, धमकी अन् व्हिडीओ व्हायरल केल्याने अटक**
**KDM NEWS प्रतिनिधी**टेंभुर्णी : सोलापूर-पुणे महामार्गालगत टेंभुर्णी येथील प्रसिद्ध हॉटेल ‘७७७७’ चा मालक लखन हरिदास माने (वय ४२, रा. टेंभुर्णी, ता. माढा) याने आपल्याच हॉटेलच्या मॅनेजरला निर्वस्त्र करून सर्व कर्मचाऱ्यांसमोर लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२५ मध्ये घडला असला तरी मारहाणीचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत हॉटेल मालक लखन माने याला अटक केली आहे.
फिर्यादी मॅनेजर निवास आप्पासाहेब नकाते (वय ४४) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात त्यांनी हॉटेलमधील काही अनियमिततेबाबत तक्रार केली होती आणि काम सोडण्याचा इशारा दिला होता. याच रागातून लखन माने संतापला. त्याने मॅनेजरला हॉटेलच्या आवारात बोलावून घेतले. तेथे त्याच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढून टाकले, खिशातील दोन हजार रुपये हिसकावून घेतले आणि अर्धनग्न अवस्थेत सर्व कर्मचाऱ्यांसमोर उभे केले.
“तू नीट काम करत नाहीस, मस्ती चढली आहे का? तक्रार करतोस? काम सोडशील तर जिवे मारून टाकीन,” अशा शिव्या आणि धमक्या देत माने याने लोखंडी पाईपने मॅनेजरवर प्राणघातक हल्ला चढवला. मारहाणीचा पूर्ण व्हिडीओ त्याने स्वतःच मोबाईलमध्ये चित्रीत केला आणि नंतर तो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर पसरल्याने संतापाची लाट उसळली.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले, “व्हायरल व्हिडीओची दखल घेऊन तात्काळ तपास सुरू केला. फिर्यादीचे जबाब नोंदवले आणि आरोपी लखन माने याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मारहाणीचा व्हिडीओ जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.”
हा प्रकार समोर आल्यानंतर टेंभुर्णी आणि परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. कामगारांच्या सुरक्षेचा आणि मालक-कर्मचारी संबंधांचा हा अत्यंत गंभीर प्रश्न असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. पोलिसांनी त्वरेने कारवाई केल्याबद्दल कौतुक होत आहे, तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या