**२६/११ च्या हुतात्म्यांना रक्ताचेच आरपण! बार्शी पोलिसांच्या शिबिरात १११ बाटल्या भरल्या**
**२६/११ च्या हुतात्म्यांना रक्ताचेच आरपण! बार्शी पोलिसांच्या शिबिरात १११ बाटल्या भरल्या**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी (जि. सोलापूर), दि. २६ नोव्हेंबर : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज मोठे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला पोलीस दलासह शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. एकूण १११ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून हुतात्म्यांना खरी आदरांजली वाहिली.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि थेट मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक सायकर यांनी सकाळपासूनच शिबिरस्थळी उपस्थित राहून सर्व व्यवस्था पाहिली. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संजय भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलीस स्टाफ सक्रिय झाला होता.
सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई, महिला पोलीस कर्मचारी, स्थानिक पत्रकार, व्यापारी, विद्यार्थी, युवक-युवती, गृहिणी तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. अर्क ब्लड बँक, बार्शी यांच्या तांत्रिक सहकार्याने रक्तसंकलन झाले.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सन्मानपत्र तसेच अर्क ब्लड बँकेचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी स्वतः काही दात्यांचे कौतुक करीत त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
“२६/११ च्या हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले, आज आपण स्वेच्छेने रक्तदान करून त्यांना श्रद्धासुमन अर्पण करतो आहोत. हे रक्त एखाद्या जखमी जवानाला किंवा गरजू रुग्णाला जीवदान देईल,” असे भावपूर्ण उद्गार पोलीस अधीक्षक श्री. अतुलचंद्र कुलकर्णी यांनी काढले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पाटील, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब घोरपडे, पोलीस नाईक संदीप कदम, महिला पोलीस शिपाई स्मिता पाटील आदींसह संपूर्ण स्टाफ आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
बार्शीतील नागरिकांनीही ही संकल्पना मनापासून उचलून धरली आणि अवघ्या काही तासांत १११ बाटल्या भरून हा उपक्रम यशस्वी करून दाखवला.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या