**सोलापूरमध्ये बेकायदा शाळा व्हॅन-रिक्षांवर धडाका; ४३ वाहनांवर कारवाई, १.८७ लाखांचा दंड**
**सोलापूरमध्ये बेकायदा शाळा व्हॅन-रिक्षांवर धडाका; ४३ वाहनांवर कारवाई, १.८७ लाखांचा दंड**
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी व्हॅन, रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये सुरक्षेच्या नियमांचा मोठ्या प्रमाणात भंग होत असल्याच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागाने खडा पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अनधिकृत आणि अवैध पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ४३ वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण १ लाख ८६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वायुवेग पथकाने शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत धडक तपासणी केली. सकाळी शाळा सुटण्याच्या वेळी आणि सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळी मुख्य रस्ते, उपनगरीय भाग आणि शाळांजवळील परिसरात ही मोहीम तीव्र करण्यात आली होती. या मोहिमेत एकूण १२१ वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यात ओव्हरलोडिंग, परवान्याशिवाय विद्यार्थी वाहतूक, फिटनेस सर्टिफिकेट नसणे, वेग मर्यादा डिव्हाइस न बसवणे, चालकाकडे वैध परवाना नसणे, वाहनात प्रथमोपचार पेटी आणि अग्निशामक यंत्र नसणे असे गंभीर स्वरूपाचे नियमभंग आढळून आले.
“विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कोणत्याही वाहनाला पाठीशी घालणार नाही. ही मोहीम आता सतत सुरू राहणार असून, पालकांनीही आपल्या मुलांना केवळ अधिकृत आणि सुरक्षित वाहनांतच पाठवावे,” असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्पष्ट केले.
या कारवाईमुळे शहरातील बेकायदा शाळा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, पालकांमध्येही दिलासा निर्माण झाला आहे. परिवहन विभागाने यापुढेही अशा मोहिमा तीव्र करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या