**बार्शीकरांचा संताप अनावर! सुयश विद्यालयाची स्कूल बस थेट उघड्या गटारीत; ३० मुले बालंबाल बचावली**
**बार्शीकरांचा संताप अनावर! सुयश विद्यालयाची स्कूल बस थेट उघड्या गटारीत; ३० मुले बालंबाल बचावली**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, २२ नोव्हेंबर २०२५**आज सकाळी साडेनऊ वाजता बाळेश्वर नाका ते तांदुळवाडी रोडवरील वळणावर खळबळजनक घटना घडली. बार्शीतील नामांकित खासगी शाळा असलेल्या सुयश विद्यालयाची स्कूल बस (क्र. MH-४४/एए ८४७१) थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या गटारीत कोसळली. बसचं पुढचं चाक गटारीत अडकल्याने बस एका बाजूला कलली आणि काही क्षणांसाठी ती उलटण्याचीच भिती निर्माण झाली. बसमध्ये प्री-प्रायमरी ते सातवीच्या सुमारे २८ ते ३० मुले होती.
सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने आणि चालकाने त्वरेने ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला. तरीही बस कलल्याने काही मुलांना किरकोळ मार लागला, तीन मुले घाबरून रडू लागली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ बस बाजूला करून सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच बार्शी ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
#### सुयश विद्यालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड
सूत्रांच्या माहितीनुसार, ही बस रोजच हाच मार्ग वापरते. रस्त्याच्या दुतर्फा उघडी गटारे आणि खोल खड्डे असूनही शाळा प्रशासनाने हा मार्ग बदलण्याची तसूभरही काळजी घेतली नव्हती. बसचा चालक आणि क्लिनर यांना या रोडची पूर्ण कल्पना होती, तरीही ते अतिशय बेदरकारपणे बस हाकत होते, असा आरोप स्थानिकांनी केला. यापूर्वीही या रोडवर अशा घटना घडल्याची माहिती असतानाही सुयश विद्यालयाने पालकांना या मार्गाबाबत लेखी सूचना देणं कटाक्षाने टाळलं होतं.
पालकांमध्ये प्रचंड संताप
“आम्ही महिन्याला हजारो रुपये फी भरतो, तरी मुलांची सुरक्षितता शून्य! शाळेनं हा रोड का वापरायचा, हे सांगितलं पाहिजे,” अशी भावना पालक व्यक्त करीत आहेत. काही पालकांनी तर आजपासून मुलांना स्कूल बसऐवजी स्वतः सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या