**ऊसाला योग्य दर मिळाला नाही तर कारखानदारांच्या गाड्या जाळू! शेतकऱ्यांचा थेट इशारा**
**ऊसाला योग्य दर मिळाला नाही तर कारखानदारांच्या गाड्या जाळू! शेतकऱ्यांचा थेट इशारा**
**KDM NEWS **वैराग/जवळगाव (बार्शी तालुका) प्रतिनिधी, दि. २९ नोव्हेंबर*ऊस उत्पादन खर्च गेल्या दहा वर्षांत जवळपास चौपट झाला तरी साखर कारखान्यांनी ऊसाचा भाव जाहीर करणे टाळले आहे. सिझनला वीस दिवस उलटूनही एकाही कारखान्याने अधिकृत भाव जाहीर केलेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता थेट कारवाईचा इशारा दिला आहे. “ऊसाला कमी भाव देणाऱ्या कारखानदारांच्या गाड्या पेटवल्या जातील,” असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी दिला.
बार्शी तालुक्यातील जवळगाव (दोन) येथे रविवारी (दि. २८) शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस उत्पादकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या घोषणांना पाठिंबा दिला.
शंकरराव गायकवाड पुढे म्हणाले, “राज्यातील बहुतांश साखर कारखाने व गुळपावडर कारखाने गाळपाला सुरुवात करून महिना उलटला तरी भाव जाहीर करत नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस कमी भावाने लुटला जातोय. सरकारकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही. मग हे कारखानदार सरकारचे बाप आहेत का? शेतकरी आता वैतागलाय. यापुढे अन्याय सहन करणार नाही. भाव जाहीर न झाल्यास व कमी भाव दिल्यास कारखान्यांच्या मालवाहतूक गाड्या, रिक्षा, अधिकारी वर्गाच्या गाड्या जाळल्या जातील. याला कारखानदार व सरकार जबाबदार राहील.”
बैठकीअंतर्गत ठरलेल्या आंदोलनाची रूपरेषा
- २३ नोव्हेंबरपासून सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखान्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन भाव जाहीर करण्याची लेखी मागणी करणार.
- भाव जाहीर न झाल्यास कारखान्यांसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन.
- ऊस तोडणी व वाहतूक बंदचा इशारा.
- येत्या आठवड्यात बार्शी तालुक्यातील सर्वच कारखान्यांवर एकाच वेळी धडक मोहीम.
यावेळी व्यासपीठावर व सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत कापसे, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कापसे, दयानंद ढेंगले, प्रदीप पाटील, आबासाहेब डिसले, किसन डिसले, सत्यवान भोसले, राजाभाऊ कापसे, शहाजी कापसे, बळीराम कापसे, दयानंद वीर, सोपान कापसे, बाळासाहेब शिंदे, रामेश्वर कापसे, लक्ष्मण कापसे आदींसह परिसरातील पाचशेहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या