**निमजाई साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला; गव्हाणीत उतरून ठिय्या, ऊस दर व थकीत बिलांसाठी तीव्र आंदोलन**

**निमजाई साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला; गव्हाणीत उतरून ठिय्या, ऊस दर व थकीत बिलांसाठी तीव्र आंदोलन** 

**KDM NEWS (जिल्हा प्रतिनिधी) २३ नोव्हेंबर २०२५ शेतकऱ्यांच्या संतापाची तीव्रता आज बार्शी तालुक्यातील निमजाई साखर कारखान्यापुढे दिसून आली. ऊसाला किमान ४००० रुपये पहिली उचल, तात्काळ दरजाहीर करणे, मागील हंगामाची थकीत बिले देणे आणि ओव्हरलोड-काटामारी थांबवणे या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याचे गाळप पूर्णपणे बंद पाडले.

सकाळी दहा वाजता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष विजय रनदेवे, तालुकाध्यक्ष हनुमंत कापसे यांच्या नेतृत्वाखाली दीड ते दोन हजार शेतकरी कारखान्यावर धडकले. घोषणाबाजी करीत त्यांनी थेट ऊस गव्हाणीत उड्या मारल्या आणि गाळप यंत्रणा ठप्प केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला, तरी शेतकऱ्यांनी गव्हाणीतच ठिय्या मांडला आणि दुपारी तीन वाजेपर्यंत गाळप बंदच ठेवले.

यावेळी बोलताना शंकरराव गायकवाड यांनी थेट इशारा दिला,  
“ऊस उत्पादन खर्च ५५०० ते ६००० रुपये क्विंटलपर्यंत गेलाय. कारखानदार मात्र २७००-२९०० रुपयांत ऊस लुटताहेत. थकीत बिले कोट्यवधींची आहेत. ही लूट तात्काळ थांबली नाही, तर वैतागलेला शेतकरी कारखाने जाळल्याशिवाय राहणार नाही. ही अंतिम ताकीद आहे.”

आंदोलनात उमेश यादव, मुसा मस्के, दत्ता कापसे, तानाजी कापसे, ज्ञानेश्वर पवार, विजय पवार, नारायण डिसले, बालाजी डिसले, किसन डिसले, दयानंद ढेंगळे, नितीन कापसे, प्रदीप पाटील, संजय शिंदे, बाळासाहेब कापसे, राणा जगताप आदींसह परिसरातील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निमजाई कारखान्याची यंदाची गाळप क्षमता ५००० टन प्रतिदिन आहे, पण मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांची १८ कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. यंदाही दरजाहीर न करता गाळप सुरू केल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला.

दरम्यान, २० नोव्हेंबर रोजीच संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना विविध कारखाने व पोलीस ठाण्यांमार्फत निवेदने देऊन २३ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज बार्शी तालुक्यातील हे पहिलेच आंदोलन पेटले. उद्या पासून सोलापूर जिल्ह्यातील इतर थकीत व काटामारी करणाऱ्या कारखान्यांवरही अशीच कारवाई होणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.

सध्या कारखाना बंदच आहे. प्रशासनाशी चर्चा सुरू असली तरी शेतकऱ्यांनी मागे हटण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जिल्ह्यात ऊस आंदोलन पेटण्याचीच चिन्हे दिसत आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**