**सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझर जीप उलटली; तीन तरुणींचा मृत्यू, १२ जण जखमी**
**सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझर जीप उलटली; तीन तरुणींचा मृत्यू, १२ जण जखमी**
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर** : नळदुर्ग येथील खंडोबा देवस्थानाच्या दर्शनासाठी निघालेल्या ऊळेगाव व हडपसर येथील नातेवाइकांच्या क्रुझर जीपला (क्र. MH-24/V-4948) शनिवारी सकाळी अंदाजे ११.३० वाजता चिवरी फाटा (ता. दक्षिण सोलापूर) जवळ भीषण अपघात झाला. पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर जीपचा पुढचा टायर फुटला आणि वाहन थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटून पलटी झाले. यात तीन तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले.
मृत तरुणींची नावे
१. पूजा हरी शिंदे (वय ३०, रा. ऊळेगाव, ता. बार्शी)
२. सोनाली माऊली कदम (वय २२, रा. हडपसर, सोलापूर)
३. साक्षी बडे (वय १९, रा. हडपसर, सोलापूर)
गंभीर व किरकोळ जखमी (१२)
कुणाल लक्ष्मण भिसे, अंजली रवी अमराळे, आकाश दत्ता कदम, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, बालाजी शिंदे, माऊली कदम, हरी शिंदे, कार्तिक अमराळे, कार्तिकी अमराळे, शिवांश कदम, श्लोक शिंदे.
अपघात इतका भीषण होता की, जीपमधील काही प्रवासी दूर फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदतनीस राजू वडवेराव व प्रहार संघटनेचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. दक्षिण सोलापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पंचनामा केला असून, अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. अपघातामुळे सोलापूर-हैदराबाद महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
देवदर्शनाच्या आनंदात निघालेल्या कुटुंबावर एका क्षणात दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या