**विद्यार्थ्यांसाठी एसटीची विशेष हेल्पलाइन सुरू; बस उशिरा सुटली तर अधिकारी निलंबित होणार – प्रताप सरनाईक यांचे कठोर आदेश**
**विद्यार्थ्यांसाठी एसटीची विशेष हेल्पलाइन सुरू; बस उशिरा सुटली तर अधिकारी निलंबित होणार – प्रताप सरनाईक यांचे कठोर आदेश**
**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, २६ नोव्हेंबर : शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घर ते शाळा आणि शाळा ते घर अशा एसटी प्रवासात कोणतीही अडचण आल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष हेल्पलाइन क्रमांक १८०० २२१ २५१ सुरू केला आहे. हा निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घेतला असून, बस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काटेकोर दखल घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
“एसटीची बस उशिरा सुटली किंवा रद्द झाली तर विद्यार्थ्यांचा तास चुकतो, परीक्षेला उशीर होतो, कधी कधी महत्त्वाची परीक्षाच हुकते. हे सहन केले जाणार नाही. अशा प्रकरणी संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना थेट जबाबदार धरण्यात येईल,” असे ठाम प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
त्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचनांचा आढावा :
- सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मुख्य बसस्थानकांवर तसेच ज्या थांब्यांवर विद्यार्थ्यांची चढ-उतार जास्त असते अशा ठिकाणी संबंधित आगाराचे पर्यवेक्षक गणवेशात हजर राहतील आणि वाहतुकीचे नियोजन करतील.
- शाळेचा शेवटचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सुखरूप बसने घरी जाईपर्यंत पर्यवेक्षक त्या ठिकाणाहून हलणार नाही.
- शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे लेखी तक्रार पत्र विद्यार्थी, पालक किंवा मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी केल्यास जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांना नुकसान झालेल्या दिवसांच्या संख्येइतके दिवस निलंबित किंवा सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल.
“विद्यार्थ्यांसाठी २४ तास कार्यरत असलेल्या १८००-२२१-२५१ या टोल फ्री हेल्पलाइनवर बस उशिरा येणे, बस रद्द होणे, बस सुटून गेल्याने अडकणे किंवा प्रवासात अन्य कोणतीही अडचण असल्यास तक्रार नोंदवता येईल. तक्रार आल्यानंतर संबंधित आगाराला तात्काळ पर्यायी व्यवस्था करणे बंधनकारक असेल.
“आमच्या मुलांचे शिक्षण आणि सुरक्षितता याला प्राधान्य आहे. एसटी ही जनतेची लाइफलाइन आहे आणि विशेषतः ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ती एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आता कोणतीही सबब चालणार नाही,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
हा निर्णय राज्यभर लागू करण्यात येत असून, येत्या काही दिवसांत सर्व आगारांना याबाबत कठोर सूचना बजावण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी एसटी प्रशासन आता खरेतर ‘अलर्ट मोड’वर आले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या