**लग्नाला अवघे १० महिने, पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय अन् डॉ. गौरी गर्जेंनी आयुष्य संपवलं; पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीच्या आत्महत्येनं खळबळ**
**लग्नाला अवघे १० महिने, पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय अन् डॉ. गौरी गर्जेंनी आयुष्य संपवलं; पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीच्या आत्महत्येनं खळबळ**
**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई : भाजप नेत्या तथा महाराष्ट्राच्या पर्यावरण, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी अनंत गर्जे (पालवे) (वय २९) यांनी शनिवारी (२२ नोव्हेंबर) सायंकाळी सुमारे ७ वाजता वरळी येथील बीडीडी चाळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नाला अवघे दहा महिने उलटले असतानाच घडलेल्या या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
७ फेब्रुवारी २०२५ रोजी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडलेल्या या विवाहाला अवघे २८७ दिवस उलटले होते. डॉ. गौरी या मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या दंतवैद्यक विभागात (डेंटल डिपार्टमेंट) कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी होत्या. तर अनंत गर्जे हे गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत अत्यंत जवळचे सहकारी म्हणून काम पाहत आहेत.
मानसिक छळ, अनैतिक संबंधाचा संशय अन् सततचे भांडण
गौरीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही महिन्यांतच अनंत गर्जे यांचे बाहेरील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय गौरीला आला. तिने अनंत यांचा मोबाईल तपासला असता त्याचे चॅटिंगचे पुरावे मिळाले. हे चॅट्स तिने आपल्या वडिलांना पाठवून ठेवले होते. यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. शनिवारी दुपारी १ वाजल्यापासून पुन्हा जोरदार भांडण सुरू झाले. गौरीने अनंतला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
गौरीचे मामा श्रीकांत पालवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “तिने चॅटिंग पाहिले होते, पुरावे आमच्याकडे आहेत. अनंत सांगतोय की तिने माझ्यासमोर गळफास घेतला, पण आमचा त्यावर विश्वास नाही. गौरी खूप हुशार आणि स्वाभिमानी होती. तिला सतत मानसिक छळ होत होता. तिच्या सासरच्या मंडळींकडूनही त्रास होत होता, असा आरोप आम्ही करतो. आम्ही पोलिसांत गुन्हा दाखल करावा यासाठी प्रयत्नशील आहोत. सामान्य माणसाला न्याय मिळत नाही ही खंत आहे.”
घटनेची वेळ अन् परिस्थिती
शनिवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता अनंत गर्जे घरी आले तेव्हा गौरीने दुबार कपड्याच्या दोरीने गळफास घेतला होता. घरात ती एकटीच होती की अनंत उपस्थित होते, याबाबत संभ्रम आहे. अनंत यांनी तात्काळ शेजाऱ्यांना हाक मारली अन् गौरीला खाली उतरवले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला असून अपमृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली आहे. गौरीच्या कुटुंबीयांनी मात्र आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (अॅबेटमेंट टू सुसाइड) गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली आहे.
पंकजा मुंडेंनी सर्व कार्यक्रम रद्द केले
या दुर्घटनेची बातमी कळताच पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सर्व नियोजित कार्यक्रम तात्काळ रद्द केले. त्या मुंबईत दाखल झाल्या असून गौरीच्या कुटुंबीयांना भेटण्याची शक्यता आहे. गौरी-अनंतच्या लग्नाला पंकजा मुंडे या स्वतः प्रीतम मुंडे यांच्यासह उपस्थित होत्या अन् त्यांनी आशीर्वाद दिले होते.
या घटनेने अवघ्या दहा महिन्यांत संपलेल्या संसाराची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मानसिक तणाव, विश्वासघात अन् कौटुंबिक कलह यामुळे एका होतकरू डॉक्टरने आयुष्य संपवले याची हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस तपास सुरू असून पोस्टमार्टम अहवालानंतर अधिक स्पष्टता येईल, असे पोलिसांनी सांगितले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या