**बार्शी बसस्थानकाचे आधुनिकीकरण : १० कोटी ७७ लाखांची निविदा प्रसिद्ध**

**बार्शी बसस्थानकाचे आधुनिकीकरण : १० कोटी ७७ लाखांची निविदा प्रसिद्ध** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. २४ ** : मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या बार्शी बसस्थानकाची दुरवस्था दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून १० कोटी ७७ लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) या पुनर्बांधणी कामाची अधिकृत निविदा प्रसिद्ध केली असून, यामुळे स्थानकाचे आधुनिकीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी ही माहिती दिली.

आमदार सोपल म्हणाले, "बार्शी बसस्थानक हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक असूनही, त्याची इमारत आणि अंतर्गत रस्ते अत्यंत जीर्ण झाले होते. यामुळे प्रवाशांकडून सातत्याने संताप व्यक्त होत होता. समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांमधून वारंवार येणाऱ्या तक्रारी आणि छायाचित्रांच्या आधारे मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना समक्ष भेटून समस्या मांडल्या. बीओटी तत्त्वावरील प्रस्ताव प्रलंबित असला तरी, फिजिबिलिटी अभावी तो रखडला होता. अखेर सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सरकारने स्वनिधीतून निधी उपलब्ध करून दिला."

ते पुढे म्हणाले, "या निधीमुळे बसस्थानकाचे संपूर्ण नूतनीकरण होईल. यात इमारतीची दुरुस्ती, रस्त्यांचे बांधकाम आणि अन्य सुविधांचा समावेश असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा मी विशेष आभार मानतो."

बसस्थानक चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एसटी बससाठी वेअर हाऊस रोडकडून नवे प्रवेशद्वार उघडण्यात आले असून, भिंत पाडून गेट बसविण्यात आले आहे. लवकरच हे द्वार कार्यान्वित होईल, असे सोपल यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे बार्शी शहरातील प्रवासी वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, स्थानकाचे उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**