*पांढरा कोट, लोखंडी जिद्द — बार्शीचे प्रथम डॉक्टर ‘आयर्नमन’ डॉ. नवदीप लोकरे यांचा प्रेरणादायी पराक्रम*
*पांढरा कोट, लोखंडी जिद्द — बार्शीचे प्रथम डॉक्टर ‘आयर्नमन’ डॉ. नवदीप लोकरे यांचा प्रेरणादायी पराक्रम*
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी** बार्शी शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणारा अभिमानास्पद पराक्रम ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. नवदीप लोकरे यांनी केला आहे. गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमन ट्रायथलॉन’ स्पर्धेत त्यांनी यशस्वी कामगिरी करत बार्शीचे प्रथम डॉक्टर ‘आयर्नमन’ होण्याचा बहुमान मिळविला आहे.
‘आयर्नमन’ ही जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक असून या स्पर्धेची सुरुवात गोवा येथील दमट वातावरणात मिरामार बीच येथून झाली. या स्पर्धेत १.९ कि.मी. समुद्रात पोहणे, ९० कि.मी. सायकलिंग, २१.१ कि.मी. मॅरेथॉन धावणे असा अत्यंत खडतर ट्रायथलॉन प्रकार समाविष्ट होता. एकूण ११३ कि.मी. अंतर असलेली ही स्पर्धा ८ तास ३० मिनिटांत पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते.
डॉ. नवदीप लोकरे यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून ‘आयर्नमन’ किताब पटकावला. विशेष बाब म्हणजे, स्पर्धा पूर्ण करताना फिनिश लाईनवर त्यांनी सादर केलेला उत्साहपूर्ण व सकारात्मक डान्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एवढी कठीण स्पर्धा पूर्ण करूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेश न दिसता आत्मविश्वास व आनंद झळकत होता, जो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मूळचे उपळाई (ठोंगे), ता. बार्शी येथील असणारे डॉ. नवदीप लोकरे यांचे कृष्णा हॉस्पिटल, सुलाखे हायस्कूल समोर, बार्शी येथे आहे. वैद्यकीय सेवेत व्यस्त असतानाही त्यांनी नियमित सराव, शिस्त आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर हा अशक्यप्राय वाटणारा पराक्रम साध्य केला.
त्यांनी अत्यंत कमी कालावधीत या स्पर्धेचा कठोर सराव पूर्ण केला तोही स्पेशल प्रशिक्षक न लावता हे विशेष उल्लेखनीय आहे.
त्यांच्या या ऐतिहासिक व प्रेरणादायी यशाबद्दल बार्शी सायकलिंग क्लब, बार्शी रनर्स क्लब, मेडिकल असोसिएशन बार्शी, उपळाई (ठोंगे) ग्रामस्थ तसेच सर्व मित्रपरिवार व सहकाऱ्यांनी डॉ. नवदीप लोकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
हा पराक्रम युवक, डॉक्टर व क्रीडाप्रेमींना निश्चितच नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या