**निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या नायब तहसीलदाराला लाचखोरीचा दणका; ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक**
**निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या नायब तहसीलदाराला लाचखोरीचा दणका; ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक**
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, दि. १७ : महसूल विभागातील भ्रष्टाचाराची आणखी एक प्रकरण उघडकीस आले असून, उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे (वय ५२, रा. शिवरत्ननगर, जुळे सोलापूर) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. हेडगिरे हे मंगळवेढा येथील माजी नायब तहसीलदार असून, सध्या उत्तर सोलापूर येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीच्या तोंडावर असलेल्या या अधिकाऱ्याच्या या कृत्याने महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.
मंडळ अधिकारी (सर्कल ऑफिसर) यांचे दीर्घकाळ थकलेले वेतन काढण्यासाठी हेडगिरे यांनी सुरुवातीला ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ४० हजार रुपयांवर सौदा ठरला. तक्रारदार मंडळ अधिकाऱ्याने ५ डिसेंबर रोजी ACB कडे तक्रार नोंदवली. त्यानंतर ACB च्या पथकाने सापळा रचला. सोमवारी (१६ डिसेंबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारताना हेडगिरे यांना अटक करण्यात आली. लाचेच्या नोटांवर अँथ्रासीन पावडर लावण्यात आली होती, ज्यामुळे पुरावा मजबूत झाला.
या कारवाईत ACB पुणे युनिटचे निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अटकेनंतर हेडगिरे यांना सोलापूर शहरातील ACB कार्यालयात आणण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे.
महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेमुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून, भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. हेडगिरे यांच्या सेवानिवृत्तीच्या काळात अशी घटना घडल्याने विभागाची प्रतिमा डागाळली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या