**देवदर्शनाच्या बहाण्याने अवैध सोनोग्राफी, नंतर बोलेरोतून गोळ्या; सुशिक्षित विवाहितेचा मृत्यू, पोलिस तपासात धक्कादायक खुलासे**

**देवदर्शनाच्या बहाण्याने अवैध सोनोग्राफी, नंतर बोलेरोतून गोळ्या; सुशिक्षित विवाहितेचा मृत्यू, पोलिस तपासात धक्कादायक खुलासे** 

**KDM NEWS बार्शी प्रतिनिधी ** सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवैध गर्भलिंग निदान चाचणीनंतर असुरक्षित गोळ्या देऊन केलेल्या गर्भपातामुळे २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना मुलींविरुद्धच्या सामाजिक भेदभावाची जाणीव करून देणारी आहे.

मृत महिलेचे नाव वृषाली वैभव मोरे (वय २८, रा. श्रीपतपिंपरी, ता. बार्शी) असे आहे. ती डी. फार्मसी शिक्षित होती आणि काही दिवसांपासून माहेरी राहत होती. ६ डिसेंबर २०२५ रोजी देवदर्शनाच्या बहाण्याने ती आई-वडिलांसोबत पंढरपूरला गेली. तेथे आरोपी विकास पवार (रा. पंढरपूर) याच्याशी संपर्क साधून एका अनोळखी पुरुष आणि महिलेसह अवैध सोनोग्राफी केली. तपासणीत गर्भात मुलगी असल्याचे सांगून आरोपींनी तिच्याकडून २० हजार रुपये घेतले.

११ डिसेंबर रोजी एक पुरुष (बोलेरो चालक) आणि अनोळखी महिला बोलेरो वाहनाने श्रीपतपिंपरीत येऊन वृषालीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. यासाठी तिने भावाच्या मोबाईलवरून आरोपींना २५ हजार रुपये ऑनलाइन दिले होते. गोळ्या घेतल्यानंतर तिची प्रकृती खालावली. तिला तीव्र वेदना आणि प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. तातडीने बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

बार्शी ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालानुसार, असुरक्षित गर्भपातामुळे 'हेमोरेजिक शॉक' झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस हवालदार अभिजीत गाटे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. बार्शी तालुका पोलिसांनी विकास पवार, बोलेरो चालक आणि अनोळखी महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०५, ६०, ६२, ३(५) तसेच पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम ५(२), ६(क), २३ अन्वये गुन्हा दाखल केला.

पोलिस तपास सुरू असून, अवैध सोनोग्राफी केंद्र कोणते, गोळ्या कोठून आल्या आणि या रॅकेटमध्ये किती प्रकरणे असू शकतात याचा शोध घेतला जात आहे. बार्शी तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून या अवैध रॅकेटवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**