**बार्शीत अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरांच्या तक्रारीवरून एकाला अटक**

**बार्शीत अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरांच्या तक्रारीवरून एकाला अटक** 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), ८ जानेवारी : पोलिसांनी बार्शी तालुक्यातील जामगाव शिवारात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट उघडकीस आणले आहे. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ३६ वर्षीय अजित सुरेश मस्तूद या व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई ७ जानेवारी दुपारी ४.४० वाजता करण्यात आली असून, प्रकरणात गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व रोग निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ च्या कलम ३(अ), १८ आणि २३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. शिंदे यांनी दिलेल्या जबाबानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांच्या सूचनेनुसार ते आणि त्यांचा बार्शी तालुका पोलीस स्टेशन मधील स्टाफ जामगाव शिवारातील वाणेवाडी रोडवरील एका पडीक शेतात पोहोचले असता. तेथे क्रेटा कंपनीची चारचाकी गाडी (क्र. एमएच ४५ एझेड २१६६) उभी असल्याचे दिसले. गाडीत दोन काळ्या रंगाच्या सॅकमध्ये संशयास्पद वस्तू सापडल्या. पंच तुषार गडदे आणि राज पेटाडे यांच्या साक्षीने तपासणी केली असता, झोनकेअर कंपनीची सोनोग्राफी मशीन (किंमत ३ लाख रुपये), चार्जर (३ हजार रुपये), गेस्टाप्रो कंपनीच्या १४४ सीलबंद गोळ्या (मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल असलेल्या), ५१ रिकाम्या गोळ्या, रक्ताळलेली क्युरेटेज, पॉज इंजेक्शन (५), सलाइन बाटल्या (आरएल २, एनएस ४, डीएनएस १), अँटीबायोटिक इंजेक्शन झोन, इकोकेअर जेल (२), ग्लोव्हज (२ बॉक्स नवे, २५ वापरलेले), डेटॉल बाटली, सिरिंज (२.५ एमएल बॉक्स, ५ एमएल ५, २ एमएल ४), स्कॅल्पवेन सुया (२२ क्र. ६, २१ क्र. २), कात्री, सलाइन पाईप, ओंडेम इंजेक्शन (३), चिकटपट्टी (२), कापूस बॉक्स आणि दोन काळ्या सॅक जप्त करण्यात आल्या. याशिवाय १५ लाख रुपयांची क्रेटा गाडी आणि ५० हजार रुपयांचा सॅमसंग एस२५ अल्ट्रा मोबाइलही हस्तगत करण्यात आला.

अजित मस्तूद हा रोपळे (ता. माढा, जि. सोलापूर) येथील रहिवासी असून, त्याने चौकशीत स्वतः अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करत असल्याचे कबूल केले. त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नव्हता. डॉ. शिंदे यांनी सांगितले की, या आरोपीने यापूर्वीही अनेक महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सर्व वस्तू सीलबंद करून जप्त केल्या असून, उपअधीक्षक अशोक सायकर यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे.

या प्रकरणाने ग्रामीण भागातील अवैध वैद्यकीय प्रक्रियांच्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. पोलिसांनी या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे संकेत दिले आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**