*महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राची मोठी मदत: ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी*
*महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राची मोठी मदत: ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी*
*KDM NEWS प्रतिनिधी*नवी दिल्ली, दि. २५ जानेवारी: महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिली. किंमत समर्थन योजना (पीएसएस) अंतर्गत ही खरेदी होणार असून, यासाठी सुमारे २,६९६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल आणि बाजारातील तूरच्या किंमती स्थिर राहण्यास मदत होईल.
नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महाराष्ट्राचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्रातील तूर उत्पादनाची सद्य:स्थिती, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि बाजारातील किंमत घसरणीवर चर्चा झाली. केंद्राने ही खरेदी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) यांच्या माध्यमातून करण्याचे ठरवले आहे. खरेदी प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळवण्याची हमी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र हे देशातील प्रमुख तूर उत्पादक राज्य असून, यंदाच्या हंगामात राज्यात सुमारे १२ लाख हेक्टरवर तूर लागवड झाली आहे. मात्र, अतिवृष्टी आणि बाजारातील अतिरिक्त पुरवठ्यामुळे किंमती घसरल्या होत्या. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सरासरी ७,००० ते ७,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळू शकतो, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान टळेल. याशिवाय, राज्य सरकारनेही तूर खरेदी केंद्रे वाढवण्याचे आणि शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय मंत्री चौहान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे आणि येत्या काळात इतर पिकांसाठीही अशा योजना राबवल्या जातील. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, त्याचा फायदा विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या