*खाकीला खंडणीचा डाव, पण सापळ्यात अडकले तिघे; १५ लाखांच्या प्रकरणात हायव्होल्टेज अटक*

*खाकीला खंडणीचा डाव, पण सापळ्यात अडकले तिघे; १५ लाखांच्या प्रकरणात हायव्होल्टेज अटक* 

*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १० जानेवारी : शहरातील एका पोलिस कर्मचाऱ्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्याच्या बहाण्याने १५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना जोडभावी पेठ पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी एम्प्लॉयमेंट चौकातील एका नामांकित हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या घटनेने सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पूजा ढवळे (वय ३७, रा. शिवगंगा नगर), मिलिंद कांबळे (वय ४७, रा. बुधवार पेठ) आणि लक्ष्मी लोंढे (वय ४५, रा. एसआरपीएफ कॅम्पजवळ) यांचा समावेश आहे. फिर्यादी जितेंद्र रामहारी भोसले (वय ४२, रा. पंचरत्न निवास, नेताजी नगर, जोडभावी पेठ) हे पोलिस कर्मचारी असून, त्यांच्यावर पूर्वी एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपींनी त्यांना वारंवार फोन करून त्रास दिला आणि गुन्हा मागे घेण्यासाठी १५ लाखांची मागणी केली.

जितेंद्र भोसले यांनी आरोपींच्या त्रासाला कंटाळून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याची दखल घेत सापळा रचला. शुक्रवारी सकाळी आरोपींनी भोसले यांना हॉटेलमध्ये बोलावले. भोसले यांनी पोलिसांना पूर्वकल्पना दिली होती. सहायक निरीक्षक विष्णू गायकवाड यांच्या नेतृत्वात पथकाने दोन पंचांसह हॉटेल परिसरात जाळे विणले.

ठरल्याप्रमाणे भोसले यांनी आरोपींना ५० हजार रुपये रोख, १.५ लाखांचा एक चेक आणि १३ लाखांचा दुसरा चेक दिला. पैसे आणि चेक स्वीकारताच भोसले यांनी बाहेर थांबलेल्या पोलिसांना फोनवर 'साहेब, काम झालंय, पार्सल घेऊन या' असा ठरलेला इशारा दिला. हा संकेत मिळताच पोलिस टीमने हॉटेलमध्ये धडक मारली आणि तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पुरावा पाहून ते गप्प झाले.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएसएस) कलम ३०८(२), ३५१(३)(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रक्कम आणि चेक जप्त केले असून, पुढील तपास सुरू आहे. ही घटना पोलिस दलातीलच व्यक्तीला लक्ष्य करणारी असल्याने चर्चेचा विषय ठरली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**