*बार्शीतील फिरत्या गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश; बोगस डॉक्टरसह सहा जणांना अटक*

*बार्शीतील फिरत्या गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश; बोगस डॉक्टरसह सहा जणांना अटक* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), दि. १२ : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात फिरत्या वाहनातून गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुख्य आरोपी अजित सुरेश मस्तुद (वय ३६, रा. रोपळे, ता. माढा) याच्यासह पाच साथीदारांना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हे रॅकेट सक्रिय असल्याचे तपासात उघड झाले आहे.

७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जामगाव हद्दीतील वाणेवाडी रस्त्याजवळील पडीक शेतात हे रॅकेट उघडकीस आले. अजित मस्तुद हा चारचाकी वाहनातून फिरून झोनकेअर कंपनीची पोर्टेबल सोनोग्राफी मशिन वापरून गर्भलिंग निदान करत होता आणि गर्भपाताच्या गोळ्या देत होता. त्याच्याकडून सोनोग्राफी यंत्र, औषधे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय बार्शीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत बळीराम शिंदे (वय ३५) यांच्या तक्रारीवरून ८ जानेवारी रोजी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ८८, ९१, वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ कलम ३, ४ आणि गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र  कायदा १९९४ कलम ३(१), ३(३), ६(अ), ६(ब), ६(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्य आरोपी अजित मस्तुद हा बोगस डॉक्टर असून, त्याला मदत करणारे साथीदार पुढीलप्रमाणे : नरेंद्र जगन्नाथ भगत (वय ४०, रा. आनंद नगर, अकलूज, ता. माळशिरस) हा गर्भपाताच्या गोळ्या पुरवठा करत होता; अकबर रशीद मुलाणी (वय ४५, रा. शिक्षक कॉलनी, केज, जि. बीड) हा बीड जिल्ह्यातून रुग्ण आणण्याचे आणि एजंट म्हणून काम करत होता; कल्पना कुशिंदर मुंडे (वय ४०, रा. कथले प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटलमागे, बार्शी) ही बार्शीतून रुग्ण पुरवत होती; छगन एकनाथ मोहोळकर (वय ३०, रा. उंदरगाव, ता. करमाळा) हा करमाळा परिसरातून एजंट म्हणून रुग्ण आणत होता; आणि प्रवीण भाऊसाहेब मासाळ (वय ३३, रा. मानेगाव, ता. बार्शी) हा मासाळ हॉस्पिटलमध्ये गर्भपात करत असून, गर्भलिंग निदानासाठी रुग्ण अजितकडे पाठवत होता.

पोलिसांनी आरोपींकडून वाहन, यंत्रसामग्री आणि औषधे जप्त केली असून, या रॅकेटमुळे किती गर्भपात झाले याचा तपास सुरू आहे. जिल्ह्यात अशा बेकायदा केंद्रांविरोधात मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**