*सोलापूर वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप; ईडी चौकशीची मागणी*
*सोलापूर वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप; ईडी चौकशीची मागणी*
*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. १३ जानेवारी : सोलापूर वन विभागातील सहायक वनसंरक्षक अजित शिंदे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगुर्डे यांच्यावर शासकीय निधीच्या गैरवापराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख लक्ष्मण विठ्ठल नाईकवाडी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या तक्रारीत, बोगस बांधकामे दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करून दोषींना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नाईकवाडी यांच्या तक्रारीनुसार, गांगुर्डे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत खासगी कंत्राटदारांना हाताशी धरून जिल्हा योजनेच्या निधीतून 'पेव्हर ब्लॉक्स आणि विविध सिव्हिल वर्क्स' नावाने बोगस कामे दाखवली. वन वसाहत कॉलनी आणि नांदणी सोलापूर येथे प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नसतानाही, वनरक्षक आणि वनपालांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून चेक देऊन निधी हडपण्यात आला. दोन तालुक्यांतील वेगळ्या ठिकाणांची कामे एकाच अंदाजपत्रकात दाखवून जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केली गेली. नांदणी येथील फॉरेस्ट इको पार्कचे काम २०२३-२४ मध्येच पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले होते, तरीही तेथील बोगस कामे दाखवून लाखो रुपये गायब करण्यात आले.
तक्रारीत शिंदे आणि गांगुर्डे यांनी लेबर शेडच्या नावाखाली १० लाख रुपयांचा निधी स्वतःच्या खिशात घातल्याचे म्हटले आहे. २०२४-२५ मध्ये वन वसाहतीत असे कोणतेही शेड बांधले गेले नाहीत, तरीही खासगी कंत्राटदार लोंढे यांच्या संगनमताने हा अपहार झाला. तक्रारदारांनी या शेडच्या 'चोरी'ची तक्रार विजापूर नाका पोलिस स्टेशनला देण्याची आणि पोलिस आयुक्तांना कळवण्याची मागणी केली आहे.
उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांच्या शासकीय निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली २५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. निवासस्थान सुस्थितीत असतानाही वेगवेगळ्या नावाने अंदाजपत्रके तयार करून कंत्राटदारांना लाभ देण्यात आला. एका इमारतीच्या नवीन बांधकामासाठी ४० लाख रुपयांचा अंदाज असताना दुरुस्तीसाठी २५ लाख खर्च दाखवणे योग्य नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कामासाठी एकत्र निविदा काढणे आवश्यक असतानाही, तीन भाग करून मर्जीतील कंत्राटदारांना फायदा दिला गेला.
शिंदे यांनी एकाच वेळी दोन शासकीय निवासस्थाने वापरून फक्त एकाचे भाडे भरल्याचा आणि गांगुर्डे यांनी शासकीय निवासस्थानात राहूनही घरभाडे भत्ता घेतल्याचा आरोप आहे. हे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(१) अंतर्गत गुन्हा असून, फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिंदे यांना या प्रकरणाचा मास्टरमाइंड ठरवत, कुलराज सिंह यांचाही सहभाग असल्याचे म्हटले आहे.
नाईकवाडी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, ईडी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ही तक्रार पाठवली आहे. चौकशीदरम्यान दस्तऐवजात हेरफेर होण्याची शक्यता व्यक्त करत, शिंदे आणि गांगुर्डे यांना तातडीने निलंबित करण्याची विनंती केली आहे. हा भ्रष्टाचार कोट्यवधी रुपयांचा असल्याने ईडीमार्फत सखोल तपास आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे सोलापूर वन विभागात खळबळ उडाली असून, वरिष्ठ पातळीवरून कारवाई होण्याची शक्यता आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या